दशावतारातील रिद्धी सिद्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशावतारातील रिद्धी सिद्धी
दशावतारातील रिद्धी सिद्धी

दशावतारातील रिद्धी सिद्धी

sakal_logo
By

प्रवास दशावताराचा

swt1619.jpg
L89459
प्रा. वैभव खानोलकर

swt1618.jpg
89458
रिद्धी सिद्धी

दशावतारातील रिद्धी सिद्धी

लीड
दशावतार ही याच लाल मातीतली लोककला आहे. कोणत्याही प्रांतातील लोककला ही त्या मातीत उगवते. त्यामुळे लोककलेवर कोणाचाच मालकी हक्क नसतो. कोणत्याही प्रांतातील लोककला जतन करताना ती लोककला जपणारे अनेक परिवार, अनेक कलावंत, सुज्ञ रसिक मोठे योगदान देतात आणि खऱ्या अर्थाने लोककला संस्कृती संवर्धनाचे कार्य करते.
यक्षगानपासून कधीच तयार न झालेल्या आणि कर्नाटक प्रांतातून न आलेल्या दशावतार लोककलेचा उगम सहाव्या शतकात मिळतो. त्यामुळे दशावतार लोककलेचा प्राचीन इतिहास बघता यात पुराणातील अनेक संदर्भ आजही जशाच्या तसेच आढळतात.
प्रा. वैभव खानोलकर
................
कोणत्याही शुभ प्रसंगी गणेशाचे वंदन करण्याची पंरपरा आपल्या संस्कृतीत आहे; पण अशीच पंरपरा जोपासत रिद्धीसिद्धीसह महागणेशाचे रंगमंचावर दर्शन देणारी दशावतार ही एकमात्र प्राचीन लोककला असावी. दशावतारात आजही पुरुष कलावंत स्त्री भूमिका करताना दिसतो. त्यामुळे रिद्धीसिद्धीच्या स्त्री व्यक्तिरेखाही पुरुष कलावंत करतात.
सात्विकपणाचा भाव, सुंदर रंगसंगती आणि तितकाच प्रभावी पदन्यास यांची अनुभूती म्हणजे दशावतारातील रिद्धी सिद्धी. अर्थात नाट्यमंडळात अभिनय करणाऱ्या कलावंतांच्या मर्यादित संख्येमुळे प्रत्येक वेळेला गणपतीसोबत दोन स्त्री वेशातील कलावंत म्हणजे रिद्धी-सिद्धी दाखले जात नाही; मात्र धयकाल्याला वा नाटक सादर करताना आपल्याला गणेशासोबत एक स्त्री वेषातील पात्र दिसते आणि सूत्रधार सुध्दा धयकाल्यावेळी सादर होणाऱ्या आड दशावतारात ब्राह्मण झालेल्या पात्राला गणपतीच्या ह्या रिद्धी सिद्धी असल्याचे सांगतो वा तशी ओळख करून देतो.
खरे तर दशावतार हे अभिनय, भाषा पांडित्य आणि वातावरण निर्मिती यावर सादर केले जाते. त्यामुळे जरी गणेशासोबत एक स्त्री कलावंत असला, तरी रसिकांना ते दोन आहेत, असे समजून घ्यावे लागते आणि ते समाजमान्यही केले जाते.
गणपतीसोबत पदन्यास आणि मग सूत्रधाराच्या विनंतीनुसार ब्राह्मण कलावंतांच्या नवसफेडीसाठी गणेशासमोर लयबद्ध पध्दतीने केलेली फुगडी सुध्दा धयकाल्याला रंग चढवते आणि येथेही विनोदी बाजाची ठेवण जपली जाते.
खरे तर रिद्धी सिद्धी भूमिका साकारणे म्हणजे रंगमंचावर येण्याची पाऊलवाट असते आणि या भूमिकेतून रंगमंचावर नवोदित, हौशी कलावंतांना ही संधी मिळते. आजही गणपतीसोबत आपल्याला रिद्धी सिद्धी बघायला मिळतात.
विविध पुराणांत या गणेशपत्नीविषयी अनेक कथा सांगितल्या आहेत; पण दशावतार त्या कथांकडे न जाता त्या कथांमधील अन्वयार्थ जपते. खरे तर मत्स्य पुराणात रिद्धी आणि बुद्धी गणेशाच्या पत्नी म्हणून सोबत दिसतात, म्हणून गणेशाला ''सिद्धिबुद्धिप्रदाय नम:'' असे म्हटले जाते. सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे शहाणपणा. म्हणजे नुसते यश नको, तर यशासोबत ते पचवण्याचा शहाणपण हवे आणि हे दोन्ही प्रदान करणारा म्हणजे गणपती.
गणेश सहस्त्रनामात ''रिद्धि सिद्धि प्रवर्धनाय नम:'' असे म्हटले आहे. रिद्धी म्हणजे भौतिक यश आणि सिद्धी म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि हे दोन्ही प्रदान करणारा म्हणजे गणपती. अशा या गणेशाचे वंदन करताना या महागणपतीच्या रिद्धी सिद्धी कसे बरे विसरून चालेल? आणि दशावतार तरी त्याला कसे बरे विसरेल!