रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

डेरवण येथे राज्य तायक्वांदो स्पर्धा

रत्नागिरी ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा १६ ते १८ मार्चदरम्यान स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण क्रीडा संकूल सावर्डे चिपळूण जिमनॅस्टिक हॉल येथे होणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अधिकृत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओमसाईचे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट २ दान अमित जाधव यांची जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या करिता जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मिलिंद पाठारे, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा महासचिव लक्ष्मण कररा (फिफ्त डन ब्लॅक ) युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटर अध्यक्ष राम कररा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
--
विद्यार्थ्यांना लेखनास प्रवृत्त करा

रत्नागिरी ः प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी लेखन हा एक उत्तम पर्याय ठरतो. अशावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वलेखनातून विद्यार्थ्यांचे भावविश्व समजते. त्यामुळे त्यांना लेखनास प्रवृत्त करणे अत्यावश्यक असल्याचे मत रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी व्यक्त केले. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या ६५व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या स्वलेखणीतून साकारलेल्या नवं आभाळ या हस्तलिखिताच्या प्रकाशन, विद्यार्थी गुणगौरव व देणगीदारांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही प्रसंगात डगमगून न जाता आयुष्यात सदैव सकारात्मक विचार करून स्पर्धात्मक विश्वाला सामोरे जाण्यासाठी पालकांनी पाल्याच्या क्षमता ओळखून त्यांच्या पंखात बळ दिले पाहिजे. हस्तलिखितामधून विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त होत असतात. मोबाईलच्या काळात विद्यार्थ्यांनी लिहिते बनावे. गजानन पाटील यांनी शाळेत हस्तलिखितासह राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या आदर्शवत प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी करत असलेल्या शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. वर्धापन दिनात भ. क. ल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्यावतीने विविध कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन शिबिर झाले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्याचा नमन आणि जाखडी महोत्सव साजरा करण्यात आला.
--
समस्यांबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी ः शहरातील प्रभाग क्र. ४ मधील कोकण नगर, कीर्तीनगर, क्रांतिनंतर, चर्मालय व परिसरातील समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसंख्याक सेलचे जिल्हा महासचिव नौसिन काझी, प्रभाग अध्यक्षा मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांनी पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन दिले. प्रभाग क्र. ४ मध्ये अंतर्गत रस्त्यांना महत्वाच्या बहुतेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघात होतात. याची दखल घेऊन या भागातील रस्त्यांवर गतिरोधक व स्ट्रीट लाईट लवकरात लवकर उपलब्ध करून द्या, अशी मागणी निवेदनात केली. रमजान सण हा महिनाभर असतो. त्या कालावधीत पाण्याच्या वेळापत्रकामुळे प्रभागातील मोठ्या भागामध्ये उपास (ईफ्तरी) सोडण्याच्या वेळेत पाणी सोडले जाते. ती वेळ बदलून काही तास आधी किंवा पुढे पाणी सोडण्याचे नियोजन केल्यास स्थानिकांना होणारा त्रास विशेषतः महिला वर्गाला टाळता येईल, असे निवेदन नमूद केले आहे. मुख्याधिकारी बाबर यांनी लवकरात लवकर या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आश्वासन काझी यांना दिले.