संक्षिप्त पान १

संक्षिप्त पान १

काजू झाडे वणव्यात खाक
राजापूर ः तालुक्यातील ससाळे आंगले येथील जांभळीतिठा परिसरातील सुमारे १२ एकरमधील काजू झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक वणवा लागल्याने ससाळे व आंगले येथील शेतकऱ्यांच्या काजूबागा या वणव्यात जळून खाक झाल्या आहेत. सध्या काजू हंगाम ऐन बहरात आला असतानाच हा वणवा लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही काजू तर पूर्णतः जळून खाक झाले आहेत. गतवर्षीही या परिसरात वणवा लागल्याने काजू जळाले होते. येथील काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे या काजूपिक हंगामावरच अवलंबून असते. बहरात आलेले काजूपिक वणव्यात जळून खाक झाले असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. हा वणवा सुमारे १० ते १२ एकरपेक्षाही जास्त परिसरात लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे.

प्रा. देशमुख स्मृती कार्यक्रम
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे माजी विभागप्रमुख (कै.) प्र. ना. देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग डॉ. मिलिंद सरदेसाई यांनी कीटकभक्षी वनस्पती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक स्तरावर व भारतात आढळणाऱ्या कीटकभक्षी वनस्पती आणि त्यांच्यातील वैविध्य सांगितले. कार्यक्रमास डीबीटी स्टार कोऑर्डिनेटर डॉ. विवेक भिडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे, माजी विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन आणि प्रा. जी. एस. कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कौशल्य विकासकेंद्राच्या प्राचार्य गौरीनंदा सावंत उपस्थित होत्या.

गोगटे- जोगळेकरमध्ये
भरडधान्य वर्षानिमित्त स्पर्धा
रत्नागिरी ः आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, रील कॉम्पिटिशन आणि पाककला स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सुनंदा कुऱ्हाडे, गौरीनंदा सावंत, प्रा. जी. एस. कुलकर्णी आणि डॉ. मंगल पटवर्धन यांनी काम पाहिले. पाककला स्पर्धेत प्रथम ऋतुजा महाडिक, द्वितीय अनुष्का नार्वेकर, अनुजा इंदुलकर, आकांक्षा भातडे, तृतीय महेक खान, ईशा पांचाळ यांनी प्राप्त केला. पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये प्रथम सारथी जाधव, द्वितीय आफा काझी, तृतीय साक्षी बोरकर, श्रुती खाडे आणि स्वाती शिंदे, सागर करंजावकर, उत्तेजनार्थ पारितोषिक पूर्वा लांजेकर यांनी पटकावले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम पारितोषिक ईशा पांचाळ, द्वितीय सिद्धी कदम आणि झैनाब काझी, तृतीय दीप्ती मेस्त्री व ऋतुजा मेस्त्री आणि उत्तेजनार्थ पारितोषिक सृष्टी घोसाळकर व श्रावणी सुर्वे यांना प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना वनस्पतींची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून रील स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत स्वानंद सोलकर, मरियम गोवळकर, अपेक्षा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

मांगले यांनी केले ढोल वाटप
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-कासारकोळवणचे प्रथम मानकरी आणि माजी सरपंच सचिन मांगले यांनी आजोबा आणि कासार कोळवणचे प्रथम मानकरी (कै.) अण्णा मांगले यांच्या स्मरणार्थ शिमगोत्सवाचे औचित्य साधत विविध गावातील ग्रामदेवतांना ढोलवाद्य स्वेच्छेने अर्पण केले. आजोबांचा वारसा जपत त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यांनी देवरूख सोळजाई, कासार कोळवण, वाघजाई साडवली, मारळ, आंगवली, निवेखुर्द, हातीव, मुरादपूर, बोंड्ये, हरपुडे, वांझोळे, मोर्डे आदी गावांमध्ये मांगले यांनी हा उपक्रम राबवला.
-----

मालाड येथील घटनेची
आमदार साळवींकडून विचारपूस
रत्नागिरी ः मुंबई येथील मालाड-आप्पापाडा येथे अचानक आग लागल्यामुळे जवळपास १८०० पेक्षा जास्त कुटुंबांची घरे आगीमध्ये जळून खाक झालीत. त्या घटनास्थळाला शिवसेना उपनेते तथा राजापूर तालुक्याचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी मालाड येथे जाऊन पाहणी केली तसेच मतदार संघातील मालाडमध्ये राहणाऱ्या परिवारांची विचारपूस केली. त्यांना धीर दिला तसेच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच तहसीलदार विनोद धोत्रे यांच्याशी घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा केली. त्या प्रसंगी राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, आप्पा पाडाचे उपविभागप्रमुख प्रदीप निकम, संदेश मिठारी, प्रवीण शेट्ये, सुधीर मोरे, सुशांत पांचाळ, रघुनाथ पांचाळ, राजापूर तालुक्यातील मालाडमधील रहिवासी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com