चिपळूण - विरोधी पक्षातील नेते अडकले चौकशीच्या फेऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - विरोधी पक्षातील नेते अडकले चौकशीच्या फेऱ्यात
चिपळूण - विरोधी पक्षातील नेते अडकले चौकशीच्या फेऱ्यात

चिपळूण - विरोधी पक्षातील नेते अडकले चौकशीच्या फेऱ्यात

sakal_logo
By

चौकशांचे राजकारण-भाग १- -----लोगो

कोकणात प्रथमच विरोधी नेते चौकशीच्या फेऱ्यात

वैभव नाईक, राजन साळवींमागे ससेमिरा ; आणखी वेळ कोणाची

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू असताना खेडमधील उद्योजक सदानंद कदम यांना साई रिसॉर्टप्रकरणी अटक करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण आता विरोधी नेत्यांची चौकशी आणि अटकेच्या ससेमिऱ्यात अडकले आहे. ईडी, एसीबी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या रडारवर जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे नेते आले आहेत. अशा प्रकारचे राजकारण जिल्ह्यात यापूर्वी कधीच झाले नव्हते, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे नेते देत आहेत.
शिवसेनेतील बहुतांश आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले आहेत; मात्र, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक यांनी अद्याप ठाकरेंची साथ सोडलेली नाही. कोकणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत करण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील नेते, आमदारांच्यामागे ईडी, सीबीआय, एसीबीची चौकशी सुरू आहे. तोच प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू झाला आहे. उद्योजक सदानंद कदम यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांना योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार राजन साळवी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) फेऱ्यात सापडले आहेत. साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. एसीबीने दिलेल्या नोटिसीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचे मूल्यांकन केले आहे. मागील चार महिन्यांपासून एसीबीकडून त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. त्यांना चौकशीसाठी अलिबाग येथे बोलावले जात आहे. ठाकरे गटाचे कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांच्याही मालमत्तेची कसून चौकशी सुरू आहे. एसीबीकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या मालमत्तेची मोजमाप सुरू केली आहे.


कोट
उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून नाना तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत; मात्र कोकणातील सामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीमागे उभा आहे. निवडणुका घेतल्या तर शिवसैनिक भाजपला जागा दाखवणार.
- भास्कर जाधव, शिवसेना नेते