
ः ...आणि सरणावरचे प्रेत उचलतात तेव्हा
rat१६७.txt
सरणावरचा मृतदेह उचलून विच्छेदनासाठी
रत्नागिरीतील प्रकार ; दाखल्याविना अंत्यसंस्कारासाठी
रत्नागिरी, ता. १६ ः ...आता मरणेही सोपे राहिलेले नाही. मरणाचेही कारण द्यावे लागते, असे म्हटले तर विश्वास बसणार नाही; पण एका घटनेने हे वाक्य खरे करून दाखवले आहे. मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी एका व्यक्तीचा मृतदेह सरणावर ठेवला. विधी आटपून अग्नी देण्याची वेळ आली तेवढ्यात त्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत तक्रार झाली अन् पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सरणावरचा मृतदेह उचलून विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे पाच तासानंतर पुन्हा या मृतदेहाला अग्नी देण्यात आला.
अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, काल रत्नागिरी शहरातील एका तरुणाचा अचानक घरी मृत्यू झाला. रात्री त्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी सोपस्कार करून मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत आणण्यात आले. अग्नीपूर्वीचे सर्व विधी पूर्ण होत आले होते. अग्नी देणार एवढ्यात रत्नागिरी पालिकेचे पथक आले. अग्नी देण्याचा विधी थांबवण्यात आला. या सर्व प्रकारामुळे अंत्यविधीला आलेले सर्वच नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारीपाजारी अचंबित झाले. कारण, स्मशानभूमीत मृतदेह आल्यावर अग्नी देण्यापूर्वी पालिकेकडून पास घ्यावा लागतो. मृत्यूचा दाखला देताना तो आवश्यक असतो. पास देण्याअगोदर मृत्यूचे कारण दाखवावे लागते. तसा डॉक्टरांनी दाखला दिलेला असतो. कालचा मृतदेह कोणताही दाखला न घेता परस्पर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना लोकांनी फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पालिकेचे पथक स्मशानभूमीत पोहोचले. अग्नी थांबवला. मृतदेह शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. विच्छेदन झाले आणि मग मध्यरात्री २ वा. अग्नी देण्यात आला. रात्री ८ वा. ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार होते ते मध्यरात्री २ वा. झाले. सरणावरून मृतदेह उचलून पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याने या प्रकाराची सर्वत्र चर्चा होती. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याला दुजोरा दिला.