
...आता नाव नसलेला शेतकरी लढवणार निवडणूक
...आता शेतकरी लढवणार निवडणूक
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; मतदारयादीत नाव नसूनही संधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः लांबलेल्या जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० मार्चला याची सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे; मात्र यंदा शासनाच्या नव्या धोरणानुसार निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मतदार यादीत नाव नसले तरी शेतकऱ्याला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरता येणार आहे. यामुळे यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी होऊन चुरस वाढणार आहे.
जिल्ह्यात सहकार रूजण्याच्यादृष्टीने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय पॅनेल आहे. सभापतीपदाच्या निवडीतही सर्वांना समान संधी दिली जाते. त्यामुळे बाजार समितीचे गेल्या काही वर्षांमध्ये चांगले काम केले. उत्पन्नवाढीच्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले; मात्र राज्यातील राजकीय घडामोडीमुळे आणि कोरोना महामारीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबली. निवडणुकीच्यादृष्टीने पावले उचलली असून अंतिम मतदार यादी सुधारणा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये गेल्या महिन्यात २७ तारखेला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ८ मार्चपर्यंत प्रारूप यादीवर हरकती, आक्षेप मागवण्यात आले होते. उद्यापर्यंत या हरकती, आक्षेपांवर निर्णय होणार आहे. २० मार्चला अंतिम सुधारित यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही यादी लावण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे; मात्र या वेळी शासनाच्या नव्या धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. उमेदवार म्हणून आता मतदार यादीमध्ये नाव असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी असलेल्याला ही निवडणूक लढता येणार आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपन शिंदे यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार आहे. ग्रामपंचायत मतदार संघासाठी ६ हजार ९८४ मतदार आहेत. सहकारी संस्था मतदार संघासाठी ४ हजार ११३ मतदार तर व्यापारी मतदार संघासाठी ५४२ मतदार आहेत.