इन्सुलीत पाचशे काजू कलमे खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत पाचशे काजू कलमे खाक
इन्सुलीत पाचशे काजू कलमे खाक

इन्सुलीत पाचशे काजू कलमे खाक

sakal_logo
By

swt१६३२.jpg
L८९५४५
इन्सुलीः येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक झाली. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

इन्सुलीत पाचशे काजू कलमे खाक
१० लाखांचे नुकसान ः प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः इन्सुली-परबवाडी येथे काजू बागायतीला काल (ता. १५) लागलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व जलवाहिनी जळून खाक झाली. ऐन काजू हंगामात बागायतीला लागलेल्या आगीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आगीत सात ते आठ शेतकऱ्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून दोन दिवस होत आले तरी शासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही आग अज्ञाताकडून लावण्यात आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.
इन्सुली-परबवाडी येथे बुधवारी दुपारी अज्ञाताकडून काजू बागायतीला आग लावण्यात आली. नेहमीप्रमाणे शिरोडकर कुटुंबीय आपल्या काजू बागेतून दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी परतले. घरात जाऊन जेवण करत असतानाच घराजवळ असलेल्या काजू बागेतून धूर दिसू लागला. यावेळी आग विझविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली; मात्र दुपारच्या वेळी आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यावेळी स्थानिकांनी आग विझविण्यासाठी मदत कार्य केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विष्णू शिरोडकर यांनी सहा वर्षांपूर्वी सुमारे दोनशे काजु कलमे लावली होती. गेली दोन वर्षे त्यांना यातून उत्पन्न मिळत आहे. त्यातील सुमारे शंभर काजू कलमे जळून खाक झाली. भदू शिरोडकर, संतोष आईर, श्रीधर शिरोडकर, दिलीप परब, महादेव शिरोडकर, दीपक शिरोडकर यांची सर्वांची मिळून सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे, तर घोगळे यांची माड बागायती खाक झाली. सध्या राज्याचे कर्मचारी पेन्शनसाठी आंदोलनात सहभागी असल्याने शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. दोन दिवस होत आले तरी एकही कर्मचारी फिरकला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तातडीने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष मेस्त्री यांनी केली.
..................