
आणखी 11 थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडल्या
८९५५४
आणखी ११ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडल्या
---
रत्नागिरी पालिका; साडेचार कोटींपैकी ५५ टक्के वसुली
रत्नागिरी, ता. १६ : पालिकेने पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ५४, तर आज ११ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. वेळेत पाणीपट्टीभरून ही कठोर कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे. एकूण साडेचार कोटींपैकी ५५ टक्के पाणीपट्टी वसुली पालिकेने केली.
रत्नागिरी पालिकेने पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला आहे. कठोर कारवाई करण्यापूर्वी शेकडो नळधारकांना १५ दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांनी पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केली. अशा थकबाकीदारांवर आजपासून नळजोडणी तोडण्याची कारवाई पाणीपट्टी वसुली पथकाने सुरू केली आहे. शहरातील सुमारे साडेनऊ हजार नळ जोडणीधारकांकडून पालिकेला दरवर्षी अडीच ते तीन कोटी रुपये कर मिळतो. परंतु, कोरोना काळातील थकबाकी धरून ही वसुली आता साडेचार कोटींवर केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकविलेल्या ५४ जणांवर आतापर्यंत नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली. नोटिसा देऊनही नागरिकांनी त्याला दाद न दिल्याने आजपासून पुन्हा पालिकेने कारवाई सुरू केली आहे. थकीत असलेल्या ११ नळ जोडणीधारकांचे कनेक्शन पालिकेने तोडले. ही कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे आणि कटू कारवाई थांबवावी, असे आवाहन पाणी विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.
सुटीतही पालिका कार्यालय सुरू
रत्नागिरी पालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी करदात्यांना आवाहन केले असून, सुटीच्या दिवशीही कर भरण्यासाठी पालिकेचे कार्यालय सुरू राहणार आहे. १८, १९, २५, २६ आणि ३० मार्चला सुटीच्या दिवशी पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त करदत्यांनी करभरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांनी केले आहे.