
बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर आश्वासनाविना स्थगित
swt१६३५.jpg
८९५७०
सिंधुदुर्गनगरीः आंदोलन सहभागी झालेले बागायतदार शेतकरी.
बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन
अखेर आश्वासनाविना स्थगित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ः महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती सन्मान योजनेंतर्गत २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १४ मार्चपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज तिसऱ्या दिवशी मागे घेतले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जमाफीच्या मागणीसाठी १४ मार्चपासून प्रशासनाच्या बंदी आदेशाचे पालन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आज तिसऱ्या दिवशीही उपोषण करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग तीन दिवस बेमुदत उपोषण करूनही प्रशासनाकडून साधी आरोग्य तपासणीही करण्यात आली नाही. तब्बल ६० तासाहून अधिक काळ उपोषणाला बसलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवाला मोल राहिलेला नाही. तसेच जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नसल्याचे यातून स्पष्ट झाले, अशी तीव्र प्रतिक्रिया उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अखेर आजच्या तिसऱ्या दिवशी आपले उपोषण तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेतला; मात्र हा लढा कायम सुरू राहील. प्रशासनाचे बंदी आदेश उठल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांची तीव्र भावना आणि ताकद काय आहे, हे दाखवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.