
बांद्यात उड्डाणपूल हद्दीतील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय
बांद्यात उड्डाणपूल हद्दीतील
अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः येथे होणाऱ्या उड्डाणपुलाची हद्द भूमी अभिलेख कार्यालयाने निश्चित करूनही काही गाळेधारक व राजकीय व्यक्तींनी विरोध केल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने २१ व २२ मार्चला पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते माजी नागराध्यक्ष संजू परब यांनी काम करू न देण्याचा इशारा दिल्याने स्थानिक व प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांनी पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, बांदा येथे उड्डाणपुलाचे काम मंजूर असून लवकरात लवकर काम सुरू करावयाचे आहे. त्यानुसार भूमिअभिलेख कार्यालयामार्फत राष्ट्रीय महामार्गाची हद्द निश्चित करण्यात आलेली आहे; मात्र काही व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी विरोध दर्शविला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामास प्रारंभ करण्यासाठी २१ व २२ ला अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात हद्द निश्चित केल्यानंतर संबंधित अतिक्रमण केलेल्या ग्रामस्थांना नोटिसा बाजाविण्यात आल्या होत्या. तसेच लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र काहींनी याला विरोध करत काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणग्रस्त गाळेधारकांनी संपादित जमिनीतील अतिक्रमण स्वतः काढून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता खटी यांनी केले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता, रत्नागिरी, बांदा पोलिस ठाणे व बांदा शहर ग्रामपंचायत यांना देखील लेखी कळविले आहे.