मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून आमदारांचा शिमगा

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून आमदारांचा शिमगा

मुंबई-गोवा महामार्ग कामाबाबत आमदारांची नाराजी

अधिवेशनात पडसाद ; नऊ वर्षानंतरही काम अपूर्णच

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्याबद्दल कोकणातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षातील आमदारांनी अधिवेशनात जणू शिमगा केला.
महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र रस्त्याच्या कामात प्रगती होताना दिसत नाही. जनआक्रोश समिती २० मार्चला मुंबईला आंदोलन करणार आहे. गणेशोत्सव, शिमगा आला की रस्त्यावरून चर्चा होते. तात्पुरती दुरुस्ती केली जाते; पण रस्त्याचे काम मार्गी लागत नाही. रोज अपघात होत आहेत. ज्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येत असल्याचा मुद्दा आमदारांनी या वेळी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामातील तांत्रिक अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला; पण आमदारांचे समाधान झाले नाही. एकूणच रस्त्याच्या कामावरून कोकणातील आमदार आक्रमक झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. आश्वासने नको, आता रस्ता पूर्ण कधी होणार ते सांगा, अशी भूमिका या वेळी त्यांनी मांडली.
कामाची सद्य:स्थिती गोव्यापासून राजापूरपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा लहानसा भाग सोडला तर उर्वरित काम मार्गी लागले आहे; पण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात रस्त्याची कामे रखडली आहेत. पळस्पे ते कासू मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी काँक्रिटीकरणाचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्य वळण रस्त्याची कामे रखडली आहेत. कासू ते इंदापूर मार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम मंजूर होऊनही सुरू झालेले नाही. रत्नागिरीत परशुराम घाटात तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे कामात अडचणी येत आहेत. तो रस्ता बंद करून काम करणे कठीण होत आहे.
----
कोट
या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण व्हायला हवे. या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असावा. दर तीन महिन्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जावा तरच महामार्गाचे काम मार्गी लागू शकेल. राज्य सरकारला मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा व्हायला हवा.
-आदिती तटकरे, आमदार
-
कोट
साडेसातशे किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम चार वर्षांत पूर्ण होते; पण नऊ वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे साडेपाचशे किलोमीटरचे काम पूर्ण होऊ शकत नाही. अशा पद्धतीने काम होणार असेल तर महाराष्ट्रात रस्त्यांची कामे कशी पूर्ण होणार? आश्वासने खूप झाली आता रस्ता कधी पूर्ण होणार हे शासनाने जाहीर करायला हवे.

-अमित साटम, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com