शासकीय कार्यालयामध्ये चौथ्या दिवशी शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कार्यालयामध्ये चौथ्या दिवशी शुकशुकाट
शासकीय कार्यालयामध्ये चौथ्या दिवशी शुकशुकाट

शासकीय कार्यालयामध्ये चौथ्या दिवशी शुकशुकाट

sakal_logo
By

शासकीय कार्यालयामध्ये संपामुळे शुकशुकाट
चिपळुणात नागरिकांची गैरसोय; २७०० कर्मचारी संपात
चिपळूण, ता. १७ ः जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. आज संपाचा चौथा दिवस असून, या संपात ९८ टक्के कर्मचारी सहभागी असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे तसेच नागरिकांची कामेही खोळंबली आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्चला चिपळुणातील प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवली, चौथ्या दिवशी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत शासनाकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार करत प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनात सर्व संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. या वेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडताना शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सुमारे २ हजार ७०० कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.
--------
चौकट
संप यशस्वी झाल्याचा दावा
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. कार्यालयामध्ये केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे हा संप पूर्णपणे यशस्वी झाला आहे. तालुक्यातील ८० ग्रामसेवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.