खातू मसालेने जपली सामाजिक बांधिलकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खातू मसालेने जपली सामाजिक बांधिलकी
खातू मसालेने जपली सामाजिक बांधिलकी

खातू मसालेने जपली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By

rat१७१२.txt

८९६५०

सैनिक व टाटा स्मारक केंद्राला दीड लाखाची देणगी

सलग दुसरे वर्ष ; खातू मसालेने जपली सामाजिक बांधिलकी

गुहागर, ता. १७ ः खातू मसाले उद्योग समुहाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून १ लाख रुपयांची देणगी आणि कॅन्सरवरील संशोधनासाठी ५० हजारांची देणगी दिली आहे. खातू परिवाराने सलग दुसऱ्या वर्षीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
''सकाळ'' माध्यम समुहातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या खातू मसाले उद्योग सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आला आहे. कोकणातील अनेक छोट्या दुकानदारांना उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम हा उद्योग करतो. उत्तम खाद्यपदार्थ बनवणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वैविध्यपूर्ण स्पर्धा आयोजित करतात. खातू मसाले उद्योगातील सर्व कर्मचाऱ्यांचा विमा खातू कुटुंबाने काढला आहे. इतकेच नव्हे तर वेतनाव्यतिरिक्त उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस प्रोत्साहन निधी दिला जातो. अशा उद्योगातर्फे गेली दोन वर्ष सैनिकांसाठी आणि आरोग्यावरील संशोधनासाठी दीड लाखांची देणगी न मागता दिली जात आहे.
या मागची प्रेरणा सांगताना शाळिग्राम खातू म्हणाले, एकदा आमच्या कंपनीत आयकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले होते. त्यांचे काम संपल्यावर गप्पा मारत असताना देशासाठी लढणारे जवान, त्यांची कुटुंबे, वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबाचे नंतरचे जीवन या विषयावर चर्चा झाली. छोट्या-मोठ्या उद्योजकांनी शासनाला कर देताना काही रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर त्याचा उपयोग कशा पद्धतीने सैनिकांच्या कुटुंबाना होतो, याचा अनुभव एका अधिकाऱ्याने सांगितला. त्याचवेळी आपणही आपल्या उद्योगाला भराव्या लागणाऱ्या कराच्या काही टक्के रक्कम देशहिताच्या कामाला देणगी स्वरूपात दिली पाहिजे, असा निश्चय केला. याबाबत मुलगा शैलेंद्र, सूरज, पत्नी प्रतिभा यांच्याशी चर्चा केली तसेच आमचे आर्थिक सल्लागार दत्ते यांनीदेखील होकार दिला. त्याचवेळी सैनिक कल्याण निधीबरोबर आरोग्यक्षेत्रालाही काही रक्कम द्यावी अशी चर्चा झाली. आजही टाटा स्मारक केंद्रातर्फे कॅन्सरवरील उपचारांबाबत संशोधन सुरू आहे. या संशोधनाला साह्य करण्याचे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाला रु. १ लाखाची आणि टाटा स्मारक केंद्राला ५० हजाराची देणगी आम्ही थेट बँकतर्फे पाठवली. ई-मेलद्वारे अशी देणगी पाठवत असल्याचे त्यांना कळवले.