
:बेनी नदीवरील पुलाअभावी 11 गावांची गैरसोय
rat1717.txt
बातमी क्र. 17 (टुडे पान 2 साठी, मेन)
बेनी नदीवरील पुलाअभावी 11 गावांची गैरसोय
ग्रामस्थ करणार उपोषण ; पुलाच्या मागणीकडे दुर्लक्षामुळे संताप
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. 17 ः तालुक्यातील झापडे कांटेकोट या गावांना जोडणाऱ्या आणि पंचक्रोशीतील सर्वच गावांना फायदेशीर ठरणाऱ्या बेनी नदीवरील पुलाच्या मागणीसाठी कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे हे सहकाऱ्यांसह येत्या 1 मे रोजी उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या या मागणीला दशक्रोशीतील 11 गावच्या सरपंचांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे. याबाबतची माहिती शांताराम सुर्वे यांनी लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत माहिती देताना माजी सुर्वे यांनी सांगितले, लांजा तालुक्यातील कांटे आणि कोट या दोन गावांना जोडणारा बेनी नदीवरील पूल होणे अत्यावश्यक बाब बनली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही ही सातत्याने मागणी करत आहोत. तालुक्याच्या पश्चिम भागातील दहा ते बारा गावांना हा पूल जोडणारा आहे तसेच हा रस्ता हा इतर जिल्हामार्ग 15 असून 16 कमी लांबीचा आहे. बेनी नदीवरील पूल झाला तर त्याचा फायदा झापडे कांटेकोटसह भडे, लावगण, खाणवली, आगवे, वाडीलिंबू वाघ्रट, बेनी, हर्चे आदी गावांना होणार आहे. पावस रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्गदेखील उपलब्ध होणारा असून त्याचा थेट फायदा दशक्रोशीतील गावांना होणार आहे.
या नियोजित पुलाचा सर्वे व अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन ते तीनवेळा यापूर्वी करण्यात आले आहे; मात्र तरीदेखील अद्यापपर्यंत या पुलाच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही आणि म्हणूनच झापडे कांटेकोट दशक्रोशीतील ग्रामस्थांची पुलाबाबत असणारी रास्त मागणी लक्षात घेऊन या या पुलाला तातडीने मंजुरी देण्यात यावी अन्यथा येत्या 1 मे रोजी आपण ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार आहोत. या परिषदेला शांताराम सुर्वे यांच्यासह झापडे- कांटे सरपंच विनया कुष्टे तसेच हर्चे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष भाई मयेकर व अन्य उपस्थित होते.
परिसरातील गावांचा पाठिंबा...
बेनी नदीवरील पुलाच्या मागणीला कोट गावासह झापडे, कांटे, कोलधे, जावडे, आगवे, उपळे, वाघ्रट, खानवली, भडे, हर्चे, पुनस या सरपंचांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याचे शांताराम सुर्वे यांनी सांगितले.
--------------