
साडवली-निवेत एनएसएस निवासी शिबिर
89656
माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
निवेत एनएसएस निवासी शिबिर
साडवली, ता. 17 ः आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर उत्साहात झाले. विद्यार्थ्यांना ग्रामस्वच्छता, समाजसेवा, श्रमदान, बौद्धिक विकास यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक आठवड्याचे शिबिर निवे गावी आठवडाभर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी एनएसएसचे उद्दिष्ट लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीसाठी झटावे तसेच यातून सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, असा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत, कार्यक्रम अधिकारी डॉ. अच्युत राऊत, निवे गावच्या सरपंच कल्याणी जोशी, उपसरपंच अमोल जाधव तसेच सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरवात पहाटे योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम व ईश्वर आराधनेने करण्यात येत होती. विद्यार्थ्यांनी गावातील शिंदेवाडी येथे बंधारा बांधला. तसेच काही ग्रामस्थांच्या घरी शोषखड्डे खणून दिले. निवेगावची ग्रामदेवता, वरदानदेवीचा मंदिर परिसर तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, सहाण, बसथांबा यांची स्वच्छता केली. तसेच निवे गावातील रस्ते स्वच्छ केले. गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा, स्वच्छ्ता, मुलामुलींमधील भेदभाव, पर्यावरण रक्षण याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पथनाट्य सादर केले. गावातील आश्रमशाळेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले.
शिबिरादरम्यान विविध विषयांवर बौद्धिक व्याख्याने आयोजित करण्यात आली. शिबिराच्या सागंता समारंभाला एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. राहुल मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. अच्युत राऊत यांनी केले तर शिबिर यशस्वीतेसाठी सहकारी प्राध्यापक कादंबरी बागायतकर, शुभांगी कांबळे, बिंदिया मोहिते, समृद्धी वाझे आणि ‘रासेयो’ चे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.