प्रलंबित असलेल्या कामांचे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित असलेल्या कामांचे काय?
प्रलंबित असलेल्या कामांचे काय?

प्रलंबित असलेल्या कामांचे काय?

sakal_logo
By

89665
सावंतवाडी : येथे आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, मायकल डिसोजा, रश्मी माळवदे, पुरुषोत्तम राऊळ आदी.


प्रलंबित असलेल्या कामांचे काय?

रुपेश राऊळ; केसरकरांनी जनतेतील आपली पत तपासावी

सावंतवाडी, ता. १७ ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर बजेटमधून सावंतवाडी तालुक्याला ५१ कोटी रुपये देत असताना कित्येक वर्षांपासून भूमिपूजन केलेल्या व प्रलंबित विकासकामांचे काय, असा सवाल उपस्थित करत केसरकरांनी मंत्रिपद सोडून गावामध्ये फिरावे, म्हणजे त्यांना त्यांची जनतेतील पत दिसून येईल, अशी टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. केसरकर जनतेची कामे करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यांना शिवसैनिकांनी निवडून दिले असून त्यांनी जनतेची कामे न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही श्री. राऊळ यांनी दिला.
येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात श्री. राऊळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, पुरुषोत्तम राऊळ, प्रसाद नाईक, संदेश केरकर, गोविंद केरकर आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘बजेटमध्ये केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यासाठी ५१ कोटी रुपये दिल्याचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी जाहीर केले; मात्र एकीकडे केसरकर कोट्यवधीचा निधी देत असताना गेली कित्येक वर्षे त्यांनी भूमिपूजन केलेली कामे प्रलंबित अवस्थेत असून हे दुर्दैवी आहे. एकीकडे जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेली बसस्थानके पूर्णत्वास जाऊनही सावंतवाडी बसस्थानकाचे काम अद्यापही रखडले, हे केसरकरांचे अपयश आहे. मल्टिस्पेशालिटीचा प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत. सावंतवाडी पोलिस परेड ग्राउंड नजीक महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे ट्रेनिंग सेंटरही अर्धवट स्थितीत आहे. हे सेंटरही आता येथून रद्द झाल्याचे समजते. त्यामुळे केसरकर या ठिकाणी सपशेल अपयशी ठरत आहेत. त्यांनी आमदारकीचा नव्हे तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जनतेत फिरावे. किती लोक त्यांच्यासोबत आहेत, हे दिसून येईल.’’
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘केसरकर गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहेत; मात्र भरीव असे योगदान देऊ शकले नाहीत. सावंतवाडी मतदारसंघातील मळगाव रेल्वेस्थानकात किती गाड्या थांबतात, हे सांगावे. मल्टिस्पेशालिटी, बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीचे काय झाले, हे सर्व जनतेला माहीत आहे. जिल्हाप्रमुश अशोक दळवी यांनी ती कामे योग्य प्रकारे करून घ्यावीत; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.’’
---
मी मुळातच सधन कुटुंबातील
श्री राऊळ म्हणाले की, मी मुळातच सधन कुटुंबात जन्माला आलो असून रत्नागिरी आणि मुंबईतही फ्लॅट आहेत. त्यामुळे ज्यांना माहिती नाही, त्यांनी खोटे आरोप करू नयेत. आपल्या नावावर असलेल्या दुकानात माझे वडील मालक म्हणून बसतात, त्यात गैर काही नाही. शहरात कित्येक वयोवृद्ध व्यापारी व्यवसाय करतात, त्यांच्यावरही टीका करणार का? ज्याला कावीळ होते त्याला सगळे जगच पिवळे दिसते. त्यामुळे टक्केवारी म्हणजे नेमके काय हे त्यांनाच विचारा.’’