घरपट्टी वसुलीचे सावंतवाडीत आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरपट्टी वसुलीचे 
सावंतवाडीत आव्हान
घरपट्टी वसुलीचे सावंतवाडीत आव्हान

घरपट्टी वसुलीचे सावंतवाडीत आव्हान

sakal_logo
By

घरपट्टी वसुलीचे
सावंतवाडीत आव्हान

६६ टक्केच काम; प्रशासनाने कंबर कसली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः येथील पालिकेने घरपट्टी वसुलीसाठी कंबर कसली आहे; मात्र आर्थिक वर्षअखेरीस काही दिवसच शिल्लक असताना पालिकेची ६६ टक्के वसुली झाली आहे. ९० टक्केपेक्षा जास्त उद्दिष्टपूर्तीचे आव्हान अधिकारी वर्गासमोर असून वेळप्रसंगी मालमत्ता सील करण्याची तयारीही प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे.
राज्यात मार्च एंडिंगपूर्वी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदा, पालिकांची धावपळ दिसून येत आहे. शंभर टक्के करसुली करून शासनाकडून पारितोषिक मिळविण्यासाठी काही पालिकांची नियोजनबद्ध तयारी असते. मागील दोन वर्षांचा विचार करता कोरोना काळात घरपट्टी वसुलीमध्ये काहीसा परिणाम दिसून आला; परंतु यावर्षी हा परिणाम भरून काढण्यासाठी घरपट्टी वसुलीचा तगादा मालमत्ताधारकांकडे लावून धरला जात आहे. सावंतवाडी पालिकेचा विचार करता एकूण मालमत्ता विचारात घेता जवळपास २ कोटी ४६ लाख ९४ हजार ७४४ रुपये इतका कर पालिकेच्या तिजोरीत जमा होणे आवश्यक आहे; परंतु शंभर टक्के कर वसूल होत नसल्याने हा आकडा कमी असतो. गतवर्षी ८५ टक्के एवढी कर वसुली झाली होती. या वसुलीसाठी आवश्यक क्लृप्त्याही वापरण्यात आल्या. वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्यांवर प्रसंगी गाळे तसेच मालमत्ता सील करण्याची कारवाई हाती घेतली होती; मात्र उद्दिष्टपूर्तीचे आव्हान अधिकारी पूर्ण करू शकले नव्हते. यावर्षी पालिकेकडे नव्याने कर निरीक्षक म्हणून प्राची पाटील या तरुण अधिकारी रुजू झाल्या आहेत. त्यांनी काही आवश्यक उपायोजना कर वसुलीसाठी तयार केल्या आहेत. आर्थिक वर्षअखेरीस अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असतांना ६६ टक्के म्हणजे १ कोटी ६२ लाख इतकी करवसुली झाली आहे. उर्वरित दिवसांत ९० टक्केंपेक्षा जास्त करवसुली करण्यासाठी मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. सात दिवसांची, तीन दिवसांची अशा दोन प्रकारच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतरही संबंधित मालमत्ताधारकाकडून घरपट्टीची भरणा केली गेली नाही, तर जप्ती वॉरंट, मालमत्ता सील करण्याच्या प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
...............
चौकट
पाणीपट्टीचेही उद्दिष्ट
शहरात ३ हजार ४०० नळधारक आहेत. वर्षभरात १ कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न यातून पालिकेला मिळते. गतवर्षी ९२.८५ टक्के् इतकी वसुली झाली होती. यावर्षी ९० टक्केपेक्षा जास्त वसुली करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आतापर्यंत ८२ टक्के म्हणजे १ कोटी ३४ लाख इतकी वसुली झाल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भाऊ भिसे यांनी सांगितले.
................
कोट
शहरातील घरपट्टी वसुलीसाठी वेगळे पथक तयार केले आहे. या पथकामार्फत वसुली सुरू आहे. आतापर्यंत ६६ टक्के वसुली झाली असली तरी ९० टक्केच्या बाहेर वसुली करण्याचे उद्दिष्ट समोर आहे. संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसी बजावल्या आहेत. त्यानंतरही घरपट्टी न भरल्यास त्यांच्यावर आवश्यक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी वेळेत घरपट्टी भरावी.
- प्राची पाटील, कर निरीक्षक, पालिका, सावंतवाडी