स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास आंदोलन

स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास आंदोलन

स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास आंदोलन

डी.एड बेरोजगार; शिक्षक भरतीत अन्याय दूर व्हावा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ ः आगामी शिक्षक भरतीत जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगारांची सरसकट भरती करून त्यांना न्याय द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सिंधुदुर्ग डी.एड बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी दिला.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी विभागात येतो. येथील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना डी.एड करून मनस्ताप झाला आहे. गेली दहा वर्षे शिक्षक भरती न झाल्यामुळे नुसत्या परीक्षाच देऊन जिल्ह्यातील डी.एड बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. काहींची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यातच अचानक ‘टेट’ म्हणजेच अभियोग्यता चाचणी लावण्यात आली. ही अभियोग्यता चाचणी २०० गुणांची होती. यासाठी वेळ दोन तास होता. या परीक्षेत चक्क २०० प्रश्नांपैकी १४० पेक्षा जास्त प्रश्न बुद्धिमत्तेवर विचारण्यात आले. त्यामुळे वेळेचा आणि प्रश्नांचा ताळमेळ लागला नाही. १३० पेक्षा जास्त प्रश्नांना न बघताच उमेदवारांना गोळे मारावे लागले. त्यामुळे ही परीक्षा कल आणि बुद्धिमत्ता तपासण्यासाठी होती की केवळ न बघता गोळे मारण्यासाठी? हे समजले नाही. या परीक्षेचा आणि शिक्षक पेशाचा काहीही संबंध लागला नाही. तसा अभ्यासक्रम घटकनिहाय निश्चित नव्हता. निव्वळ बँक मॅनेजर पदासाठी होते तशी परीक्षा होती, असे अख्ख्या महाराष्ट्रामधून सांगितले जात आहे. त्यामुळे या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदाची पदभरती करू नये. तसे केल्यास तो डी.एड धारकांवर अन्याय होणार आहे. बरीच वर्षे भरती नसल्यामुळे डी.एड बेरोजगारांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. परजिल्ह्यातील शिक्षक नोकरीसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात आणि दोन-तीन वर्षांनी आपल्या जिल्ह्यात बदली करून निघून जातात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डोंगरी भागाचे निकष, बोलीभाषा निकष, सद्यस्थितीचा विचार करता सिंधुदुर्गमधील रिक्त असलेल्या ११११ पदांची शिक्षक पदभरती करत असताना स्थानिक जिल्हा पातळीवर सरसकट डी.एड पदविका मेरीटचाच विचार करून १९९६, २००७ मध्ये झालेल्या भरतीप्रमाणे शिक्षक भरती व्हावी. जेणेकरून जिल्ह्यातील बरीच वर्षे प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांना न्याय मिळेल आणि भविष्यातील बदली प्रक्रियेचा प्रश्न मिटून जाईल. या विषयाची सिंधुदुर्ग डी.एड बेरोजगार संघटनेने यापूर्वी निवेदने सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, शिक्षणमंत्री यांना दिली. या विषयाचा विचार न करता स्थानिकांच्या विरोधात जाऊन पदभरती केल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सिंधुदुर्ग डी.एड बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष फाले यांनी पत्रकातून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com