
शिवप्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
शिवप्रतिष्ठानतर्फे
रक्तदान शिबिर
रत्नागिरी : येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त येत्या सोमवारी (ता. २०) सकाळी १० ते १ टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गरजेच्यावेळी २४ तास मोफत रक्त मिळण्याची सुविधा, प्रत्येक रक्तदात्यांना डोनर कार्ड, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शाखाध्यक्ष राकेश नलावडे, जयदीप साळवी, अमेय पाडावे, यश डोंगरे यांच्याशी संपर्क साधावा.
------------
न्या. रामशास्त्री पुस्तक
वकील संघटनांना प्रदान
रत्नागिरी : महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे लेखक व ज्येष्ठ ॲड. विलास पाटणे लिखित न्या. रामशास्त्री प्रभुणे हे पुस्तके महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या २२ मार्चला सकाळी १०.३० वाजता ठाणे येथील टाऊन हॉलमध्ये होणार आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी वकील परिषदेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वकील परिषदेचे सदस्य ॲड. गजानन चव्हाण, ठाणा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम यांनी केले आहे. शास्त्रानुसार न्याय होईल, निरपेक्ष न्यायाला नाती मंजुर नसतात, या नात्याने निवाडा करणारे न्या. रामशास्त्री यांनी मराठी दौलतीचे सर्वसत्ताधिष राघोबादादा यांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा देऊन निःपक्षपाती व निर्भिड न्यायदानाच्या मापदंड अधोरेखित केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांनी या पुस्तकाला दिलेल्या अभिप्रायात म्हणाले की, रामशास्त्री कोण होते त्यापेक्षा रामशास्त्री बाणा म्हणजे काय हे नव्या पिढीला कळणे महत्त्वाचे आहे. ते सांगण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.
---------
पुरोहित मंडळातर्फे
नवचंडी याग
रत्नागिरीः पुरोहित मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सग्रह नवचंडी याग गुरुवारी करण्यात आला. सलग चार वर्षे माजी खासदार नवचंडी पुरोहित मंडळ याग करत आहे. दोन दिवसाच्या या उपासनेत प्रथम दिवशी नीलेश राणे यांच्या आरोग्य, यश, कीर्ती आणि आगामी निवडणूक यामध्ये यश मिळण्याच्यादृष्टीने संकल्प करून देवता स्थापन केली आणि १० पाठ वाचण्यात आले. दुसऱ्या दिवशी अग्नीस्थापना करून ग्रहयज्ञ करून सप्तशतीचे मिश्रद्रव्याने हवन केले तसेच कुमारीपूजन, सुवासिनी पूजन, तर्पण मार्जन करून सर्व कर्माची समाप्ती करण्यात आली. या कार्यक्रमात पुरोहित मंडळ रत्नागिरीचे वे. मु. विश्वास (नाना) जोशी, दिनेश जोशी, विशाल खेर, श्रीपाद कुलकर्णी, अमोल जोशी, संदीप परांजपे, रविशंकर पंडित, संदीप वीरकर, दीपेश काळे, धनंजय नवाथे आणि सर्व पुरोहित सहभागी झाले होते.
----------------------