चांदेराईवासियांची पुरापासून कायम मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदेराईवासियांची पुरापासून कायम मुक्तता
चांदेराईवासियांची पुरापासून कायम मुक्तता

चांदेराईवासियांची पुरापासून कायम मुक्तता

sakal_logo
By

८९६१९
८९६२१
८९६२०
-------
चांदेराईवासियांची पुरापासून कायम मुक्तता
काजळी पात्रातील गाळ उपसा; ३० टक्के काम शिल्लक, ७ फूट खोदाई
रत्नागिरी, ता. १७ः दरवर्षी पावसाळ्यात काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेतील दुकानदारांसह अनेक नागरिकांचे नुकसान होत होते. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६०० मीटर लांब आणि सात फूट खोल खोदाई पूर्ण झाली आहे. अजून ३० टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात चांदेराईवासियांची पुरापासून कायमस्वरूपी मुक्तता होणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी गतवर्षी गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजनमधून २५ लाख रुपये तर पाटबंधारे विभागाकडून मशिनरी उपलब्ध करून दिली होती. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी शंभर मीटर अंतरावरील गाळ काढला होता. एक मशिन आणि एक डंपर असल्यामुळे जास्त गाळ काढता आला नव्हता; मात्र यंदा पाऊस गेल्यानंतर डिसेंबरमध्ये पाटबंधारे विभागाकडून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू झाले. गेले ३ महिने दोन पोकलेन, एक लोडरसह नदीपात्रातील गाळ काढला जात आहे. पात्रातील गाळ नदीच्या किनाऱ्यावर आणून टाकण्यासाठी ३ डंपर दिवसभर काम करत आहेत. चांदेराई पुलापासून हरचिरी धरणाच्या भिंतीपर्यंत सुमारे ९०० मीटर परिसरातील गाळ काढला जाईल. आतापर्यंत सहाशे मीटर अंतरातील गाळ काढला आहे. सात फुटापेक्षा अधिक खोल खोदाई केली असून काजळी नदीचे पात्र गेले अनेक वर्षांपासून गाळाने भरलेले होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे नुकसान होत होते. हरचिरीमार्गे लांजा रस्ता वाहतुकीलाही बंद पडायचा. मे महिन्यापर्यंत नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू राहिले तर भरपूर काम पूर्ण होईल. त्यामुळे पुढील पावसाळ्यात चांदेराई बाजारपेठेतील व्यावसायिकांसह आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांची पुरापासून मुक्तता होणार आहे.
---------------
चौकट १
गतवर्षी कमी त्रास
२००५, २०१३, २०१९ आणि २०२१ मध्ये पुराने कहर केला. पुलावर सहा फुटापेक्षा अधिक उंचीवरून पुराचे पाणी वाहायचे. २०१३ ला बाजारपेठेतील दुकानांची छपरे फक्त दिसत होती. २०२२ मध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही; मात्र दोनवेळा पुराचे पाणी बाजारपेठेपर्यंत आले होते. त्यात काही दुकानांचे नुकसान झाले होते.
----------------
चौकट २
...तर गाळ पुन्हा पात्रात येईल
गतवर्षी पात्रातील काढलेला गाळ किनाऱ्यावर ठेवला होता. त्यातील बराचसा गाळ पावसाळ्यात वाहून गेला. यंदा काढण्यात येत असलेला गाळही किनाऱ्यावर साठवून ठेवला आहे. तो वेळीच तेथून नेण्यात आला नाही तर पावसाळ्यात गाळ वाहून नदीपात्रात येण्याची शक्यता आहे.
------
कोट
नदीतील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे; मात्र पात्र दहा फूट खोल खोदले गेले तर पुराचा धोका कमी होऊ शकतो. पुरावेळी निर्माण होणार्‍या परिस्थितीचा अभ्यास करून पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला पाहीजे.
- दादा दळी, माजी उपसरपंच
--------------
कोट
काजळी नदीतील ७० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. पात्रातील तीन मीटरची खोदाई झाली असून, सहाशे मीटर लांबीतील गाळ काढला गेला आहे.
- विनय साळुंखे, उपअभियंता, यांत्रिकी विभाग