
रखडलेल्या चिपळूण बसस्थानकाचे काम रेंगाळत सुरू
८९६४५
---------
चिपळूण बसस्थानकाचे काम रेंगाळले
कामावर चार-पाच कामगार ; सहा वर्षानंतरही प्रकल्पाचा पायाही नाही
चिपळूण, ता. १७ः गेल्या सहा वर्षापासून येथील हायटेक एसटी बसस्थानकाची प्रतीक्षा अनेकांना लागून राहिली आहे. नवीन ठेकेदाराची नेमणूक केल्यानंतर या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु सुरवातीस सुरू झालेले काम चार दिवसांतच थंडावले. परिणामी, महिनाभर कामाचा पत्ता नव्हता. अखेर पुन्हा रखडलेले काम सुरू झाले खरे; परंतु या बसस्थानकाच्या कामासाठी अवघे चार-पाच कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे रेंगाळलेल्या या कामास बूस्टर डोस देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तिन्ही बसस्थानकांचे काम एकाचवेळी २०१७ मध्ये सुरू केले होते. यामध्ये रत्नागिरी बसस्थानकाचा प्रकल्प सर्वाधिक मोठा आहे. त्यासाठी सुमारे १० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्या पाठोपाठ चिपळूणसाठी ३ कोटी ८० लाखतर लांजा बसस्थानकासाठी १ कोटी ५० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांचे काम तितक्याच तत्परतेने हाती घेण्यात आले होते. तत्कालिन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते धुमधडाक्यात या प्रकल्पांचा आरंभदेखील झाला होता. जिल्ह्यातील चिपळूण बसस्थानकाच्या कामाचा ठेका स्कायलार्प, रत्नागिरीचा ठेका दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शन आणि लांजा बसस्थानकाचा ठेका एस. व्ही. एंटरप्रायजेस या कंपन्यांना देण्यात आला. या कामासाठी दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शनला ३६ महिन्यांची मुदत तर स्कायलार्प व एस. व्ही. एंटरप्रायजेसला प्रत्येकी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती; मात्र हे काम सुरू होऊन ६ वर्षे उलटली तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. काही प्रमाणात झालेल्या कामातील लोखंडदेखील आता गंजून गेले आहे.
गेल्या ५ वर्षात या विषयी अनेकांनी निवेदने व आंदोलने केली आहेत; परंतु या प्रकल्पांना आजतागायत गती मिळालेली नाही. परिणामी, प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचेही हाल होत असल्याने या प्रश्नी मध्यंतरी येथील अॅड. आवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणीही होत आहे; मात्र शासनाकडून अजूनही बसस्थानकाचे काम सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आगारात उभे राहण्यासाठी शेडचीही व्यवस्था नसल्याने उन्हाळा, पावसाळ्यात प्रवाशांना बाहेरच उभे राहावे लागते. प्रवाशांचे हाल सुरू असतानाच कोणीही त्याकडे लक्ष देताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी सातारा येथील ठेकेदारास चिपळूणच्या बसस्थानकाचे काम मिळाले. या ठेकेदाराने दमदारपणे कामाला सुरवात केली खरी; परंतु ती तकलादू ठरली. सुरू झालेले काम महिनाभर बंद राहिले. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून पुन्हा बसस्थानकाच्या कामाला सुरवात झाली; मात्र मोठ्या कामावर केवळ चार-पाच कामगार आणि यंत्रणा कार्यरत आहे. कामाची गती अशीच राहिल्यास आणखी काही वर्षे हे काम सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.