
थकबाकीदारांची नावे फलकावर झळकवणार
८९६५५
थकबाकीदारांची नावे फलकावर झळकवणार
राजापूर पालिकाः १०० हून अधिक लोकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः मर्यादित उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या राजापूर नगरपालिका प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेष पथकांमार्फत मोहीम राबवूनही कराची रक्कम थकित आहे. त्यांच्याविरोधात पालिका प्रशासन अॅक्शनमोडवर आली आहे. त्या थकबाकीदारांची नावे फलकावर झळकवण्याच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. याला पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दुजोरा दिला आहे. या यादीत सुमारे १०० हून अधिक थकबाकीदारांचा समावेश आहे.
राजापूर ‘क’ वर्गीय नगर पालिकेत मोडते. मर्यादित स्त्रोत असल्याने पालिकेने कराद्वारे मिळणारे उत्पन्न हाच हक्काचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. करवसुलीत कोरोना महामारीपासून अनियमितपणा आला आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठी गठित केलेल्या पथकांमार्फत करवसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, तरीही ज्या थकबाकीदारांकडून करभरणा करण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे, अशांची फलकांवर नावे झळकवण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. थकित करदात्यांच्या नावांचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी थकित करदात्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून नावे जाहीर करण्याच्या पवित्र्यामध्ये पालिका प्रशासन आहे. त्यामुळे अशा थकबाकीदार वेळेमध्ये करभरणा करणार की त्यांच्यावर थकित करदाते म्हणून फलकावर झळकण्याची नामुष्की ओढवणार, याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, ज्या करदात्यांनी अद्यापही कराची रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी तातडीने करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी भोसले यांनी केले आहे.