माचाळमध्ये रंगला सापड लोककला महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माचाळमध्ये रंगला सापड लोककला महोत्सव
माचाळमध्ये रंगला सापड लोककला महोत्सव

माचाळमध्ये रंगला सापड लोककला महोत्सव

sakal_logo
By

89698
89639

माचाळमध्ये रंगला सापड लोककला महोत्सव
शतायुषी जोडप्याची घोडागाडीतून मिरवणूक; रोजगारासाठी तरुणांना मदतीचे आश्वासन
लांजा, ता. १७ः रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या गावातील पर्यटन बहरावे या हेतूने राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने गावात प्रथमच सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. गावातील शतायुषी जोडपे सखाराम रावजी भातडे आणि लक्ष्मीबाई सखाराम भातडे यांचे औक्षण त्यांच्या घरापासून समारंभाच्या स्थळापर्यंत घोडागाडीतून सवाद्य मिरवणूक काढून महोत्सवाचा प्रारंभ झाला.
शेजारीच असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडापेक्षा अधिक उंची लाभलेले हे गाव अजूनही दुर्गम आहे. गावात स्वातंत्र्यांच्या ७० वर्षांनंतर तीन वर्षांपूर्वी रस्ता पोहोचला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि गावातील तरुणांना रोजगारासाठी आवश्यक ती मदत जिल्हा बँकेकडून करण्याचे आश्वासन दिले. कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, पर्यटनाचे अभ्यासक धीरज वाटेकर, युयुत्सु आर्ते, लांजाचे माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, नितीन कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
राजापूर-लांजा नागरिक संघाने प्रकाशित केलेली पुस्तके, कोकणी वस्तू कलादालन, विजय हटकर यांनी निसर्गरम्य माचाळच्या काढलेल्या आणि संकलित केलेली छायचित्रे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. माझे माचाळ या विजय हटकर यांनी लिहिलेल्या पर्यटनपुस्तिकेचे प्रकाशन झाले. सापड लोककला महोत्सवाच्या प्रचारासाठी आलेले यु ट्यूबवर विकास चव्हाण, माचाळ गावातील घरांच्या मातीच्या भिंती बोलक्या करणारे चित्रकार अजित गोसावी, पर्यटनदूत शहानवाझ सारंग, गिर्यारोहक अरविंद नवाले यांचा यावेऴी सन्मान करण्यात आला. समारोपाला संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, नगरसेवक नंदराज कुरूप, गावकर पांडुरंग पाटील, विजय इंदुलकर, आप्पा साळवी, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर आदी उपस्थित होते.

चौकट
लोककलांनी जिंकली मने
जागतिक पौष्टिक अन्नधान्य वर्षाचे औचित्य साधत माचाळ गावात घेतल्या जाणाऱ्या नागलीच्या पिकापासून विविध पदार्थ बनवून लांजातील सुहासिनी सार्दळ यांनी ते सादर केले. या वेळी गोविंद मांडवकर आणि सहकाऱ्यांचे डफावरचे गाणे, माचाळच्या महिला मंडळाची हाताची फुगडी, शाहीर रूपेश मांडवकर आणि सहकाऱ्यांचे जाखडी नृत्य, लांजातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी माचाळ माझे गाव हे गीत तसेच आदिवासी नृत्य सादर केले. माचाळने जोपासलेली सापड लोककला गावकरी पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली माचाळवासीयांनी सादर करून महोत्सवाला उपस्थित पर्यटकांची मने जिंकली.