
सघन लागवडीद्वारे आंब्याचे उत्पन्न चौपट
89693
जयगड ः जेएसडब्ल्यू प्रकल्पात 2007 मध्ये केलेली आंब्याची सघन लागवडीचे विहंगम दृश्य.
-
सघन लागवडीद्वारे आंब्याचे उत्पादन चौपट
जेएसडब्ल्यूमध्ये प्रयोग; 1200 कलमांमधून 16 टन उत्पादन
मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 17 ः कोकणात सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आंबा लागवड केली जाते; परंतु जयगड येथील जेएसडब्ल्यू प्रकल्पाने त्यांच्या आवारात सघन लागवड करून गेल्या काही वर्षांत चौपट उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती प्रकल्पातील लागवड अधिकाऱ्यांनी दिली. कातळ व पडिक जमिनीमध्ये 2007 ला 1200 आंबा कलमांची लागवड करण्यात आली. यातून दरवर्षी 15 ते 16 टन आंबा उत्पादन हमखास मिळत आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक व उत्पादनाविषयी माहिती घेण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.
या प्रकल्पात 70 टक्के हापूस व इतर जाती रत्ना, केसर, आम्रपाली, मल्लिका, केसर यांचे प्रमाण 20 टक्के परागीकरण करण्यासाठी ठेवण्यात आले होते. आंबा लागवड घनपद्धतीने केल्यामुळे चौपट झाडे जास्त लागल्याने उत्पन्नात वाढ झाली. सूर्यप्रकाश कलमांमध्ये सर्वत्र पोहोचण्याच्यादृष्टीने दोन कलमांतील लागवड दक्षिण-उत्तर ठेवली आहेत.
या लागवडीतून दरवर्षी 15 ते 16 टन उत्पादन हमखास मिळत असून सर्व झाडे चांगल्या स्थितीमध्ये असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. बागेचे चांगले व प्रभावी व्यवस्थापन डॉ. वैभव शिंदे व डॉ. पुजारी, उमेश लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून देखभालीचे काम अनुभवी व कृषिशिक्षित अनिल पाटील, महादेव सोनवडकर, मिलिंद दळवी व कुशल कामगार विघ्नेश, नरेंद्र सावंत, बलेकर, गुरव, शाम, संजय, प्रवीण सुर्वे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
-
कोट
काटेकोर पाणी नियोजन, कमीत कमी औषधे, कमीत कमी रासायनिक खते ठिबकमधून सोडून आंबा बाग व्यवस्थित जोपासली आहे. प्रति झाड फळे कमी घेतल्याने झाडात ताकद शिल्लक राहते व झाड रोगाला बळी पडत नाही. रोग कमी व औषध कमी हे सूत्र तयार होत असल्यामुळे कमी खर्चात, कमी पाण्यात व कमी जागेत अधिकाधिक टनेज उत्पन्न मिळून नफा वाढतो. फवारणी झाडाच्या सर्व भागावर व्यवस्थित करणे शक्य होत असल्याने रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण होते. पक्की फळे हाताने देठासह सहज काढता येतात.
- अनिल पाटील