जिल्हा कृषी उत्पन्नचे मतदार निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा कृषी उत्पन्नचे मतदार निश्चित
जिल्हा कृषी उत्पन्नचे मतदार निश्चित

जिल्हा कृषी उत्पन्नचे मतदार निश्चित

sakal_logo
By

‘कृषी उत्पन्न’चे मतदार निश्चित

पंचवार्षिक निवडणूक लवकरच; सहा हजार ८२६ जणांना हक्क

ओरोस, ता. १७ :जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होवू घातली आहे. यासाठी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. २० मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीनुसार समितीच्या निवडणुकीसाठी ६ हजार ८२६ एवढे मतदार निश्चित झाले आहेत. यात विकास संस्था मतदार दोन हजार ७३१ असून ग्रामपंचायत सदस्य मतदार ४ हजार ७० एवढे आहेत. थेट मतदार म्हणून व्यापारी परवानाधारक असलेल्या २५ सभासदांचा यात समावेश आहे. ही निवडणूक जिल्ह्यातील राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
जिल्ह्यातील काही महत्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. यात जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, तालुका खरेदी विक्री संघ, देवगड अर्बन बँक यांचा समावेश आहे. तर काही महत्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका शिल्लक राहिल्या आहेत. यात जिल्हा खरेदी विक्री संघ, सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांचा समावेश आहे. यातील राज्य सहकार विभागाच्या आदेशानुसार जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.
मतदार निश्चिती करण्याच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. यावेळी शासनाने ग्रामपंचायत सदस्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे यावर्षी कृषी समितीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढणार आहे. पहिल्यांदा केवळ विकास संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार होता; मात्र, आता ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार दिल्याने सहकार विभागाची या निवडणुकीची व्याप्ती वाढली आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक विभागाने यापूर्वी विकास संस्था मतदार व ग्रामपंचायत सदस्य मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली होती; परंतु डिसेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नव्याने झाल्या होत्या. त्यामुळे या सदस्यांची प्रारूप मतदार यादी सहकार विभागाला पुन्हा प्रसिद्ध करावी लागली आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी ३२५ ग्रामपंचायतीच्या ३१८६ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर ८ मार्च पर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत होती. १७ मार्च रोजी यावर निर्णय देण्याची अंतिम मुदत होती. २० मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
--
चौकट
मे महिन्यात निवडणूक शक्य
अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर पुढील दहा ते पंधरा दिवसांत निवडणूक जाहीर केली जाते. त्यामुळे मार्च अखेर अथवा एप्रिल महिन्यात निवडणूक जाहीर होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया एप्रिल अखेर अथवा मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
--
चौकट
२५ थेट मतदार झाले निश्चित
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी थेट मतदार २५ निश्चित झाले आहेत. या बाजार समितीकडून व्यापारी असल्याचा रीतसर परवाना घेतलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार असतो. त्यानुसार व्यापारी परवानाधारक असलेल्या २५ जणांची प्रारूप मतदार यादीत मतदार म्हणून निवड झाली आहे.
--
चौकट
ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ग्राम पंचायतमध्ये कारभारी म्हणून निवडून येणारे सदस्य हे शेतकरी असतात. त्यामुळे शासनाने त्यांना यावर्षीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदानाचा अधिकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
--
तालुकानिहाय मतदार
तालुका*ग्रामपंचायत सदस्य*संस्था संचालक
दोडामार्ग*३३४*१४४
सावंतवाडी*५९०*३९४
वेंगुर्ले*३६४*२६३
कुडाळ*६७८*४१७
मालवण*७२२*३५१
कणकवली*६२२*४५८
वैभववाडी*३२२*३०१
देवगड*४३८*४०३