संपकऱ्यांचा चौथ्या दिवशी घंटानाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपकऱ्यांचा चौथ्या दिवशी घंटानाद
संपकऱ्यांचा चौथ्या दिवशी घंटानाद

संपकऱ्यांचा चौथ्या दिवशी घंटानाद

sakal_logo
By

८९७१२
--------
संपकऱ्यांचा चौथ्या दिवशी घंटानाद
शासनाचे दुर्लक्ष; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कारभार
रत्नागिरी, ता. १७ ः जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंद आजच्या चौथ्या दिवशीही सुरू होता. शासनाकडून चर्चेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आज संपकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद केला. एकच मिशन, जुनी पेन्शन. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. संपामुळे शासकीय कार्यालयाच्या नियमित कामांवर परिणाम झाला आहे. आरोग्य विभाग, प्रशासनानाचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.
जुनी पेन्शन लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, पालिका, आरोग्य, अंशकालीन कर्मचारी आदी बेमुदत संपावर आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १८ हजार कर्मचारी सामिल असल्याने शासकीय कामकाज आणि आरोग्यसेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. शासनाने जुन्या पेन्शनवर अभ्यास करण्यासाठी समिती नेमली असली तरी त्यावर संपकऱ्यांचे समाधान झालेले नाही. अखेर शासनाने कारवाईचा बडगा उगारला असून काही संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली; परंतु राज्याचा निर्णय असल्याने राज्याकडून जो आदेश येईल त्याची अंमलबजवाणी आम्ही करू, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संप कायम आहे. शासनाकडूनही कर्मचाऱ्यांना चर्चेला बोलावण्यात आलेले नाही; मात्र या संपाला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार तात्पुरती पर्यायव्यवस्था प्रशासनाने केली आहे.
अतिमहत्वाची कामे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही कामे केली जात आहेत तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील १२ विभागातील २५३ कर्मचारी संपात सहभागी झाले असून ५१३ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाचा कारभार आहे. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील काही कर्मचारी आज संपात सहभागी झाले. खानसामान विभागातील कर्मचारी संपात गेल्याने खासगी कर्मचाऱ्यांकडून रुग्णांचे जेवण तयार करण्यात आले. आरटीओ विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम सांभाळत आहेत. शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आज चौथ्या दिवशी संपकरी अजून आक्रमक झाल्याचे दिसले. त्यांनी मोठी घंटा आणून घंटानाद केला तसेच चमचाने थाळी बडवून जोरदार घोषणाबाजी केली.