चिपळूण ः डोंगर कटाईवेळीही खालून धोकादायक वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः डोंगर कटाईवेळीही खालून धोकादायक वाहतूक
चिपळूण ः डोंगर कटाईवेळीही खालून धोकादायक वाहतूक

चिपळूण ः डोंगर कटाईवेळीही खालून धोकादायक वाहतूक

sakal_logo
By

89643

--------
डोंगर कटाईवेळीही वाहतूक सुरूच
परशुराम घाट पुन्हा धोकादायक; कधी दरड तर कधी दगड रस्त्यावर
चिपळूण, ता. १७ः मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी मोठी डोंगरखोदाई सुरू आहे. या ठिकाणी मोठे दगड रस्त्यावर कोसळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा परशुराम घाट धोकादायक बनला आहे.
या स्थितीमुळे वाहनचालक धास्तावले आहेत. तूर्तास तरी या मार्गावरील वाहतूक सुरू आहे; मात्र या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून या चौपदरीकरणाअंतर्गत परशुराम घाटात डोंगरकटाई व सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामांतर्गत यापूर्वी डोंगरकटाई करताना मोठे दगड पेढे येथे वस्तीत कोसळून नुकसान झाले होते. घाटात दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. काही वेळ वाहतूक खोळंबली होती. यापूर्वी घडलेल्या अपघातांचा गांभीर्याने विचार करून डोंगरकटाई करणे गरजेचे आहे; परंतु तसे न करता डोंगरात रस्त्याच्या वरच्या बाजूला डोंगरात कटाई सुरू आहे आणि खाली वाहतूकही सुरू आहे.
कोकणातील हाच परशुराम घाट पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नंतर या घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान परशुराम घाट दुरुस्तीच्या कामाकरिता दिवसा बंद ठेवण्यात आला होता; मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर याच परशुराम घाटातील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. शिमगोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील चाकरमानी खासगी वाहनाने कोकणात दाखल होत आहेत. त्यांना परशुराम घाटमार्गे कोकणात दाखल व्हावे लागत आहे. घाटात कधी दरड कोसळते तर कधी खोदाईच्या कामाच्या ठिकाणाहून मोठे दगड रस्त्यावर येतात. या परिस्थितीमध्येही घाटातील वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादा दगड वाहनावर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

कोट
घाटातील वाहतूक सुरू असताना डोंगरकटाई सुरू आहे. घाटातील वाहतूक दिवसा बंद करून ती पर्यायी मार्गे वळवण्याची गरज आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभागाला वारंवार सूचना केल्या आहेत. येथे मोठी दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि चौपदरीकरणाचे काम करणारी एजन्सी राहील.
- शौकत मुकादम, माजी सभापती चिपळूण
-------------
कोट
डोंगरकटाई करताना काही काळासाठी आम्ही वाहतूक बंद करतो. दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत केले जाते. प्रशासनाने महामार्ग काही दिवसासाठी बंद केल्यास आम्हाला काम करणे सोपे जाईल.
- मीनाजी कल्याण टोलवेज कंपनी