संजय कदम यांचे पंख कापण्याची रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय कदम यांचे पंख कापण्याची रणनीती
संजय कदम यांचे पंख कापण्याची रणनीती

संजय कदम यांचे पंख कापण्याची रणनीती

sakal_logo
By

चौकशांचे राजकारण--भाग दोन

संजय कदम यांचे पंख कापण्याची रणनीती
सदानंद कदमावर कारवाई; अनिल परब यानाही शह
मुझफ्फर खानःसकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ः आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांच्यासमोर माजी आमदार संजय कदम यांचे आव्हान आहे. संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी अनिल परब, सदानंद कदम बळ देणार. संजय कदम यांच्या शिवसेनेतील प्रवेशासाठी उद्धव ठाकरे स्वतः खेडला आले होते. तेव्हा झालेली गर्दी शिंदे गटासाठी धोक्याचा इशारा असल्यामुळे माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय कदम यांचे पंख कापण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्योगपती सदानंद कदम यांना ईडीकडून झालेली अटक म्हणजे रामदास कदम यांनी एका दगडात अनिल परब, संजय कदम असे पक्षी मारलेच शिवाय भाऊ सदानंद कदम यांचे पंख कापल्याची चर्चा सुरू आहे.
माजी परिवहनमंत्री अनिल परब सुरवातीपासून ईडीच्या रडारवर आहेत. माजी मंत्री अनिल परब आणि रामदास कदम यांचे बधू सदानंद कदम हे दोघे व्यावसायिक मित्र आहेत. सदानंद कदम आणि रामदास कदम यांचे पटत नाही. अनिल परब यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते तेव्हा त्यांनी रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना बळ न देता माजी आमदार संजय कदम यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रामदास कदम यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मदतीने अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी अनधिकृत साई रिसॉर्टचे प्रकरण बाहेर काढल्याची चर्चा सुरू होती.
साई रिसॉर्टप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आली आहे. पारदुले हे मंडळ अधिकारी आहेत. त्यांना दापोली पोलिसांकडून अटक केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांसह शासकीय अधिकारीही ईडीच्या कारवाईला बळी पडले आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय असेलेले सदानंद कदम यांना सर्वात आधी अटक करण्यात आली. त्यानंतर दापोलीचे माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक केली तर सुधीर पारदुले यांना आता दापोली पोलिसांनी अटक केली. पुढील काळात आणखी कितीजणांना अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोट
साई रिसॉर्टप्रकरणी पहिला गुन्हा दापोलीचे ग्रामसेवक अनिल कोळी यांच्यावर दाखल झाला होता. आम्ही आमची बाजू कोर्टात मांडली. त्यानंतर ग्रामसेवक कोळी यांना जामीन मंजूर झाला. कोणाच्याही दबावाच्या राजकारणाला बळी न पडता आम्ही संघटना म्हणून ग्रामसेवक कोळी यांच्यामागे उभे राहिलो. शेवटी सत्याचा विजय झाला.
- अनिल शिंदे, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना रत्नागिरी