रत्नागिरी ः ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
रत्नागिरी ः ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी ः ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

sakal_logo
By

ढगांच्या गडगडाटासह अवकाळी
आंबा बागायतदार धास्तावले; कीडरोग, बुरशी, अ‍ॅथ्रॅक्सनॉजची भीती
रत्नागिरी, ता. १७ ः हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटे विजांचा कडकडाट सुरू होता. त्यानंतर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून कीडरोगांसह बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यापासून हापूस सुरक्षित ठेवण्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरणामुळे अ‍ॅथ्रॅक्सनॉजचे डाग फळावर पडण्याची भितीही वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे बुधवारी (ता. १५) रात्री रत्नागिरीत काही ठिकाणी हलका पाऊस शिंतडला. गुरुवारी दिवसभर हवा कुंद होती. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता; मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले. पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचे तांडव सुरू झाले. पावसाची हलकी सरही पडू लागली. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरू होती. साडेचार वाजण्याच्या सुमारास वातावरण शांत झाले. हवेत गारवाही जाणवू लागला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आकाश ढगाळ होते. त्यानंतर हळूहळू ऊन वाढू लागले; परंतु हलके वारे वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. रत्नागिरी तालुक्यात कोतवडे, गणपतीपुळे, पावस, मजगाव, खाडीपट्टा परिसरात पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे तुडतुड्यासह अन्य कीडरोग आंब्यासह मोहोरावर आढळून येण्याची भिती बागायतदारांना सतावू लागली आहे. काही प्रमाणात फळावर डाग पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात पाठवण्यास रत्नागिरीतील बागायतदारांनी सुरवात केली आहे. दरम्यान, १८ मार्चपर्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व विजेच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

कोट
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांसह बुरशीचा प्रादुर्भाव शक्य आहे. दुपारी कडकडीत ऊन पडले तर आंबा अ‍ॅथ्रॅक्सनोजपासून काहीअंशी सुरक्षित राहील.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार