
रत्नागिरी ः भूविकासच्या 547 शेतकऱ्यांना साडेदहा कोटीची कर्जमाफी
पान १ साठी)
जिल्ह्यात ५४७ शेतकऱ्यांना
साडेदहा कोटी कर्जमाफी
भूविकास बॅंक; मार्चअखेर सातबाराही होणार कोरे
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या कर्जदारांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. बॅंकेच्या जिल्ह्यातील ५४७ कर्जदारांचे १० कोटी ५२ लाख ९१ हजार ७४१ एवढे कर्ज माफ केले आहे. कर्ज माफ झालेल्या या कर्जदारांच्या सातबाऱ्यावरील बोजा तत्काळ कमी करून सातबारा कोरा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या कर्जदारांचे सातबारा मार्चअखेर कोरे होणार आहेत.
राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर लगेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूविकास बँकांच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासननिर्णय काढून कर्जमाफीचे आदेश दिले होते; मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कायम होता. त्यामुळे अन्य ठिकाणाहून कर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
शासननिर्णयानुसार जिल्ह्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या बँकेच्या ५४७ वैयक्तीक शेतकरी कर्जदार आणि ५ सहकारी संस्थांचे एकूण कर्ज १० कोटी ५२ लाख ९१ हजार ७४१ एवढे होते. ते शासन निर्णयानुसार माफ झाले आहे. या शेतकऱ्यांचे सातबारावर नोंदलेले बँकेचे कर्जाचे बोजेदेखील कमी करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च २०२३ ला आदेश काढून शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. शेतकरी बांधवांनी तालुका तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
तालुकानिहाय शेतकरी संख्या
रत्नागिरी - ५३
राजापूर - १३१
मंडणगड - ६४
गुहागर - ६६
दापोली - ३२
देवरूख - २५
लांजा - ४७
चिपळूण - ५७
खेड - ७५