
कुडाळमध्ये १९ मार्चपासून विविध उपक्रम
89767
कुडाळ ः पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय पडते, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळमध्ये १९ मार्चपासून विविध उपक्रम
संजय पडते ः आमदार नाईकांच्या वाढदिनाचे निमित्त
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस १९ ते २६ मार्च या कालावधीत सांस्कृतिक, आरोग्य आणि सामाजिक अशा विविध कार्यक्रमांनी भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, कबड्डी स्पर्धा, शिमगोत्सव (रोंबाट) अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.
यावेळी अमरसेन सावंत, राजन नाईक, रुपेश पावसकर, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, राजू गवंडे, शेखर गावडे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, विनय गावडे आदी उपस्थित होते. पडते म्हणाले, "आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरातून ५०० बाटल्या रक्त संकलन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, शिमगोत्सव (रोंबाट, राधा नृत्य, चित्ररथ, देखावे) आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिर १९ ला रोजी असरोंडी, २० ला पिंगुळी, २१ ला कुडाळ शिवसेना शाखा, २३ ला पावशी, २४ ला घोटगे व २६ ला विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, शिरवल येथे होणार आहे. निमंत्रितांची जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा २३ व २४ ला सायंकाळी ६ वाजता कुडाळ तहसील नजीक क्रीडासंकुल मैदान येथे होणार आहे. यासाठी विजेता ३५ हजार व चषक, उपविजेता २० हजार व चषक, तृतीय, चतुर्थ प्रत्येकी ७ हजार व चषक व इतर वैयक्तिक बक्षिसे आहेत. २५ मार्चला सायं ६ वाजता विविध रंगी शिमगोत्सव कुडाळ तहसील नजीक क्रीडासंकुल मैदान येथे होणार आहे. यामध्ये पारंपारिक रोंबाट, राधा नृत्य, चित्ररथ, देखावे, गायन होणार आहे. या कार्यक्रमांचा सिंधुदुर्गवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव) बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.