
जुन्या ग्रंथसंपदेच्या डिजिटलायझेशनचे आव्हान
८९७७८
रत्नागिरी : अॅड. दीपक पटवर्धन
-
जुन्या ग्रंथसंपदेच्या डिजिटलायझेशनचे आव्हान
अॅड. पटवर्धन ; नगर वाचनालयात २५ वर्षाची कारकीर्द
रत्नागिरी, ता. १८ ः गेल्या २५ वर्षांत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयामध्ये ग्रंथ, पुस्तकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक करण्यात यश मिळाले तसेच प्रकाशित झालेलं पुस्तक तत्काळ वाचनालयात उपलब्ध करून देत आहोत. जुन्या ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन करण्याचे आव्हान समोर आहे. जुनी झालेली इमारत नव्याने बांधणे, तत्पूर्वी शासनस्तरावर जागेच्या कराराला मान्यता मिळवणे ही दोन कामे अपूर्ण आहेत. २०० वर्षांच्या उंबरठ्यावर हे वाचनालय उभे आहे. द्विशताब्दीच्या वर्षापर्यंत ही दोन्ही आव्हाने साकार करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
वाचनालयातील कारकिर्दीला शनिवारी (ता. १८) २५ वर्षे होत असल्याच्या पूर्वसंध्येला अॅड. पटवर्धन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कारकिर्दीचा आढावा घेतला. ते म्हणाले, १८ मार्च १९९८ ला वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाचा सदस्य झालो व लगेचच कार्यवाह म्हणून निवड झाली. (कै.) डॉ. ज. शं. केळकर, (कै.) डॉ. वि. म. शिंदे, (कै.) दादासाहेब शेट्ये, अरुण नेरूरकर अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. संस्थेचा कार्यवाह झालो त्या वेळी मन, वृत्ती एवढी परिपक्व नव्हती. कार्यवाह झाल्यानंतर प्रथितयश कंत्राटदार पी. डी. महाजन यांनी वाचनालयाला ८० हजारांचा संगणक संच भेट दिला. आमदार अशोक मोडक यांच्या स्थानिक विकासनिधीतून ७५ हजार रुपये वाचनालयासाठी मंजूर करून घेतले होते. या दरम्यान वाचनालयाचा शतकोत्तर अमृत महोत्सव धूमधडाक्यात पार पडला.
२ मार्च २००३ ला अध्यक्षपदाची धुरा हाती आली. लगेचच रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार निकम यांनी ३ लाख ४६ हजारांची मोठी देणगी वाचनालयाला दिली. २००३ पासून वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून गेली २० वर्षे काम पाहत आहे. अथक प्रयत्नांनी वाचनालयाची आर्थिक स्थिती सुधारण्यात यश आले. अद्ययावत दालने, कार्यालय, पुस्तकांची रोलिंग कबर्ड सिस्टीम, अद्ययावत हॉल, नूतनीकरण, रंगरंगोटी, जीर्ण सिमेंटचे पत्रे बदलून नवे स्टीलचे पत्रे बसवून घेतले. नवीन तंत्रज्ञानाने वाचनालयाच्या सेवांचे संगणकीकरण, सॉफ्टवेअर, पुस्तकाच्या तपशीलवार नोंदी दर्शक स्वतंत्र अॅप केले,अशी जंत्रीच अॅड. पटवर्धन यांनी दिली.
-
पुस्तकांसाठी भरपूर निधी
पुस्तक खरेदीसाठीचा निधी कधीही कमी पडू दिला नाही. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे रंगतात. व्याख्याते, कलाकार येथे येतात व त्यांच्या व्याख्यानमाला, मुलाखती होतात. वाचनालय हे सांस्कृतिक केंद्र व्हावे, जनमानसावर आरूढ राहावे असा प्रयत्न मी व सहकाऱ्यांनी सातत्याने केला.
अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन