
दरदिवशी 56 हजार महिलांना लाभ
दरदिवशी ५६ हजार महिलांना लाभ
महिला सन्मान योजना ; एसटी तिकिटात ५० टक्के सवलत
रत्नागिरी, ता. १७ : सरकारने एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देणार असा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात दरदिवशी प्रवास करणाऱ्या सुमारे १ लाख ६० हजार प्रवाशांपैकी ३५ ट्क्के महिला प्रवासी असतात. म्हणजे दरदिवशी साधारण ५६ हजार महिलांना या महिला सन्मान योजनेचा लाभ होणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. जवळपास ३० प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ ते १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकिट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. आज एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्ह्यात एसटीच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे १ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी ३५ टक्के महिलावर्ग प्रवास करतो, असा एसटी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार दरदिवशी जिल्ह्यातील ५६ हजार महिलांना या योजनेचा लाभ होणार असल्याचा अंदाज आहे.