
कर्जतमधील सागाची वाडीत रानगव्याचे दर्शन
कर्जतमधील सागाची वाडीत रानगव्याचे दर्शन
नेरळ ः कर्जत तालुक्यात जानेवारी महिन्यात रानगव्याचे दर्शन झाले होते. त्या वेळी आलेल्या रानगव्याने वनविभागाला चार दिवस पळविले होते. आता पुन्हा माथेरान डोंगर परिसरात रानगवा दिसला आहे. आदिवासी भागात रानगवा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सातारा येथील महाबळेश्वरमध्ये अधिवास असलेला रानगवा २९ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यात आढळला होता. भिसेगाव खिंडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रानगवा रात्री दिसला होता. सकाळी माणगावतर्फे वरेडी या गावातील लोकांना रानगव्याचे दर्शन झाले. रानगव्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी गव्याच्या चार दिवस शोध घेतला होता. त्यानंतर त्याला भीमाशंकर जंगलात पळवण्यात आले. बुधवारी पुन्हा माथेरानजवळच्या सागाची वाडीत रानगवा दिसून आला. याबाबत ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला कळवले. माथेरान वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांना गव्याबाबत माहिती देत सतर्कतेच्या सूचना केल्या. दरम्यान गवा पाण्याच्या शोधात फिरत असल्याने त्याला कुणीही त्रास देऊ नये, तसेच फोटो काढण्यासाठी जवळ जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
--
चोरीच्या तपासासाठी रेवदंड्यामध्ये महाआरती
रेवदंडा ः अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळेमधील पर्वतवासी दत्तमंदिरातील चांदीचे नक्षीकाम केलेला सुमारे ४० किलो वजनाच्या आणि चोवीस लाख रुपयांच्या पत्र्याची चोरी गत डिसेंबरमध्ये झाली होती. त्या घटनेला तीन महिने उलटूनही तपास न लागल्याच्या गृह विभागाच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी रेवदंडा पोलिस ठाण्यात असलेल्या श्री दत्त मंदिरात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाआरती करण्यात आली. चौल मंदिरांचे गाव असून रेवदंडा ही प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने चोरीचा तपास लागणे गरजेचे आहे. तपास लागला नाही तर अन्य मंदिरे व व्यापारी आस्थापनांना चोरीच्या प्रकाराला वारंवार सामोरे जावे लागेल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. आठ दिवसांत हा तपास लागला नाही तर अलिबाग शहरापर्यंत नाक्यानाक्यांवर महाआरती करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, पाठारे क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष सुरेश घरत (कोटकर) यांनीही चोरांना जन्मठेपेची शिक्षा करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी केली. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन, सर्वपक्षीय स्थानिक नेते, पंचक्रोशीतील सुमारे पाचशे नागरिक यावेळी उपस्थित होते. यात महिलांचा संख्याही मोठी होती.
--
मिनीडोअर चालक आक्रमक
अलिबाग ः मिनीडोअर चालकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने रायगड जिल्ह्यातील संतप्त मिनीडोअर चालकांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी आंदोलन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वतःला रॉकेलने पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मिनीडोअर संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिनीडोअर संघटनेने दोन महिन्यांपूर्वी साखळी उपोषण केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही सरकारकडून मिनीडोअर संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची बैठक घेतली नाही.
---
अनवाणी राहण्याचा निर्धार
पाली : जुनी पेन्शन मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारपासून (ता.१४) बेमुदत संप पुकारला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. मोर्चे निघत आहेत. पालीतील ग. बा. वडेर विद्यालयाचे सहशिक्षक सुधीर शिंदे यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निर्धार केला आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा नियमित करा, रिक्त पदे अग्रक्रमाने भरावीत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या आदी मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी संप पुकारला आहे.
--
ग्रामीण भागात नागरिकांची गैरसोय
महाड : संपामुळे महाडमधील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.जुन्या पेन्शन योजनेसह आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारी कर्मचारी यांनी चवदार तळे येथील प्रांगणामध्ये जमा होऊन बुधवारी सरकारी धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. महसूल विभाग व पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कामकाज सुरू नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. अनेक सरकारी योजनांची कामे तसेच विविध योजनांची लाभार्थ्यांसाठी मार्च अखेरपर्यंत अनेक कामे पूर्णत्वास घ्यावयाची असतात परंतु संपामुळे कामांना खीळ बसली आहे. पाणीटंचाई व इतर कामे देखील संपामुळे ठप्प झाली आहेत.