
शंकरेश्वराच्या अभिषेकाला कावडीतून पाणी
(१२ मार्च पान सहा)
आख्यायिकांचे आख्यान.............लोगो
rat१८p२.jpg ः
८९८२६
धनंजय मराठे
rat१८p३.jpg ः
८९८२७
कावड पालखी घरोघरी नेताना.
rat१८p४.jpg ः
८९८२८
घरामध्ये दर्शनासाठी बसलेली पालखी.
--
शंकरेश्वराच्या अभिषेकाला कावडीतून पाणी
कोकणच्या सांस्कृतिक ठेव्यातील परंपरा, वारसा कोकणवासीय आजही मोठ्या भक्तिभावाने जपत आलेत. सिंधुदुर्गचा दशावतार, रत्नागिरीचे नमन खेळे आणि जाखडी नृत्य, रायगडमधील खालूचा बाजा हा सांस्कृतिक ठेवा कोकणची खरी ओळख समजली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कोदवली गावात नाचवले जाणारे कावड खेळे म्हणजे संपूर्ण कोकणातील एक अनोखी परंपरा समजली जाते. पूर्वीच्या काळी येथे असणाऱ्या कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे पाचशे वर्षापूर्वी सिद्धेश्वर बाबा गोसावी नामक सिद्धपुरुष या कावडीचा उपयोग श्री देव शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करू लागले. पुढे हीच परंपरा कोदवली ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. शिमगोत्सवात पालखीसोबत ही कावड सजवून मोठ्या भक्तिभावाने नाचवली जाते.
श्री देव शंकरेश्वराच्या कावडीचा महिमा आगळा आहे. शिमगोत्सव काळात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर ती नाचवत सादर केले जाणारे नृत्य लोभसवाणे असते. या कावडीमध्ये अर्धा तांब्या भरलेले पाणी कालांतराने दोन घागरी भरतील एवढे होते असे येथील भक्तगण सांगतात. राजापूर शहरानजीकच्या कोदवलीचे ग्रामदैवत श्री देव शंकरेश्वरच्या धार्मिक उत्सवाची परंपरा असलेला ‘कावड’ खेळ ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा बनून राहिला आहे. श्री देव शंकरेश्वरची ‘कावड’ हा एक खेळ आहे. अशा प्रकारचा खेळ अवघ्या महाराष्ट्रात आमच्या तरी पाहाण्यात नाही. श्री देव शंकरेश्वराच्या कावडीचा महिमा आगळा आहे. शिमगोत्सव काळात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर ती नाचवत सादर केले जाणारे नृत्य लोभसवाणे असते. देवाची कावड नवसाला पावते म्हणून श्रद्धेने नवसही बोलले जातात. शिमगोत्सवात श्री देव शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही घरोघरी फिरवली जाते. विशिष्ट पेहरावातील खेळे पालखीबरोबरच कावडही नाचवतात; मात्र कावड नाचवण्याचे वाद्याचे ठेके हे थोडेसे वेगळे असतात. कावडीच्या मध्यभागी मोठे घुंगूर लावण्यात आले असल्याने नाचवताना त्याचा मंजूळ स्वर घुमू लागतो. कावडीच्या दोन्ही बाजूला गायीची दोन मुखे लावण्यात आली आहेत. प्रत्यक्ष कावड रंगीत कापडाने सजवली जाते.
या कावडीच्या परंपरेची आणि श्री देव शंकरेश्वराच्या स्थापनेची कथाही तितकीच रंजक आहे. सुमारे पाचशे वर्षापूर्वीची ही कथा आहे. त्या काळी कोदवली गावची मूळ देवस्थाने आकार ब्राह्मणदेव, चौंडेश्वरी, गांगो विठ्ठलादेवी ही देवस्थाने सध्या असलेल्या श्री शंकरेश्वर मंदिरापासून दूर मांडवकरवाडी व अन्य ठिकाणी होती. त्या काळी सिद्धेश्वर बाबा गोसावी नामक सिद्धपुरुषाला श्री देव शंकरेश्वराने स्वप्नात दृष्टांत दिला. दुसऱ्या दिवशी पाहतात तर स्वप्नात सांगितलेल्या ठिकाणी स्वयंभू पिंडी त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सिद्धेश्वर बाबा गोसावी या सत्पुरुषाच्या पुढाकाराने या ठिकाणी देव शंकरेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. या पिंडीवर नजीकच असलेल्या एका बारमाही झऱ्यावरून श्री सिद्धेश्वर बाबा हे कावडीने नित्य पाणी आणून अभिषेक करत असत. त्यावरून ‘कावडीचे पाणी’ नावाने हे ठिकाण पुढे रूढ झाले. मंदिरानजीक हे ठिकाण असल्याचे ग्रामस्थ सांगतात तर आषाढी कार्तिकीला ते कावडीने गंगेचे पाणी आणून श्री शंकरेश्वरावर अभिषेक करत असत. पुढे या सिद्धेश्वर बाबांनी समाधी घेतली. त्यांच्या पश्चात गावकऱ्यांनी पुढाकार घेत देवस्थानची घडी बसवली. श्री देव शंकराबरोबरच मंदिर सान्निध्यात श्री ब्राह्मणदेव, श्री महाकाली, सिद्धेश्वर बाबांची स्मृती म्हणून श्री सिद्धेश्वर आणि पूरक स्थापना केली आणि गावऱ्हाटी सुरू झाली. गावचे रायकर, मांडवकर, तरळ, मांडवे, कोंबडेकर, गोडांबे, झेपले, सागवेकर, अफंडकर, सुतार इ. प्रमुख असे १२ मानकरी नेमले गेले तर देवस्थानचे पूजारी म्हणून लिंगायत आणि भाविक गुरव यांची नेमणूक केली गेली. अशाप्रकारे गावऱ्हाटीचा कारभार सुरू झाला. देवस्थानच्या शिमगोत्सव आणि टिपूर आणि अन्य उत्सवाबरोबरच सिद्धेश्वर बाबा गोसावी या सत्पुरुषाची आठवण म्हणून ही त्यांची ही ‘कावड परंपरा’ या उत्सवाचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून गेली. शिमगोत्सव आणि त्रिपुरी पौर्णिमेला श्री देव शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही सजवली जाते. हा चमत्कार पाहायला प्रचंड गर्दी होते. कावडीच्या सजावटीचा मान तरळ मंडळींकडे आहे. तिची पूजा केली जाते आणि पालखीसोबत नाचवली जाते. या कावडीत असलेल्या दोन्ही कळशांमध्ये पूजेच्या वेळी गावकार अर्ध भांडं पाणी घालतात. देवाच्यादृष्टीने ज्या घरी समाधानकारक वातावरण असतं म्हणजे जिथे भक्तीभाव आढळतो तिथे या कळशांतलं पाणी वाढतं आणि भरून वाहू लागतं, असा या कावडीचा आजवरचा अनुभव आहे. कावड पालखीसोबत जरी सर्वत्र नेली जात असली तरीही सगळीकडेच हे पाणी वाढत नाही. जिथे भाव असेल, श्रद्धा असेल तिथेच देव प्रचिती देतो, अशी माहिती प्रमुख मानकरी विनायक महादेव रायकर यांनी दिली. या लेखासाठी जे. डी. पराडकर यांचे साह्य झाले.
(लेखक लोकजीवन अन् लोकरितीचे अभ्यासक आहेत.)
-