
आगामी निवडणुकांमध्ये मतभेद नको
89840
कुडाळ ः विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीयमंत्री नारायण राणे. शेजारी नीलम राणे, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, विशाल परब, वेदिका परब आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
आगामी निवडणुकांमध्ये मतभेद नको
केंद्रीय मंत्री नारायण राणे; विकासाचे श्रेय भाजपलाच
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यायाने कोकणचा विकास भाजपनेच केला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीमध्ये एकही जागा विरोधी पक्षाकडे जाणार नाही याची काळजी घ्या. कुठलेही अंतर्गत वाद नको, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल (ता. १७) येथे केले. राणे कुटुंबीय नेहमीच जिल्हावासीयांच्या पाठीमागे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब आणि त्यांच्या सहकार्याने भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आशिया खंडातील भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ हे महानाट्य येथील नवीन डेपोच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले. या महानाट्याला उद्योजिका नीलम राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, दत्ता सामंत, विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक परब, वेदिका परब, अशोक सावंत, संध्या तेरसे, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, पप्या तवटे आदी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री राणे म्हणाले, ‘‘माझा मुलगा नीलेश याच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्य सुंदर आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल परब कुटुंब व सहकाऱ्यांचे आभार मानतो. नीलेश व नीतेश हे माझे दोन्ही चिरंजिव जिल्ह्यात व महाराष्ट्रात सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, धार्मिक आदी सर्वच क्षेत्रांत भाजपच्या माध्यमातून प्रामाणिकपणे विधायक काम करीत असून याचा मला अभिमान आहे.’’
आमदार नीतेश राणे यांनी, जिल्हा व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज नीलेश राणे यांच्यासाठी जनसमुदाय जमा झाला. त्यांचे नाव घेताना मी माजी खासदार म्हणणार नाही. कारण ते २०२४ चे भावी आमदार आहेत. त्यांना आमदार करण्यासाठी आपण काम करूया, असे आवाहन केले. राजन तेली यांनी पुढच्या वर्षी नीलेश राणेंचा वाढदिवस भव्य स्वरुपात साजरा करू, असे सांगितले. अभिनेते दिगंबर नाईक, बादल चौधरी, नागेश नेमळेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
---
एकही जागा विरोधकांना जाऊ नये
मंत्री राणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गचा पर्यायाने कोकणाचा विकास भाजपनेच केला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये एकही जागा विरोधी पक्षाला जाता कामा नये, याची काळजी घ्या. केंद्रातील मोदी सरकारने जनतेला भरभरून दिले आहे. त्यामुळे लोकसभेत ४० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्यासाठी आतापासूनच कामाला लागलो आहोत. भाजपने कोकणावर पर्यायाने सिंधुदुर्गवर नेहमीच प्रेम केले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच निवडणुकीत भाजपचे कमळ फुलण्यासाठी कार्यकर्त्यांनी अंतर्गत वाद मोडीत काढत एकजुटीने कामाला लागावे.’’