
‘शिवगर्जना’ने डोळ्यांचे पारणे फेडले
89841
कुडाळ ः ‘शिवगर्जना’ महानाट्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश.
89842
कुडाळ ः महानाट्यासाठी उपस्थित हजारो शिवप्रेमींसह केंद्रीयमंत्री नारायण राणे, नीलम राणे, नीलेश राणे, नीतेश राणे, विशाल परब आदी. (छायाचित्रे ः अजय सावंत)
‘शिवगर्जना’ने डोळ्यांचे पारणे फेडले
कुडाळातील महानाट्य; राज्याभिषेक सोहळा ठरला लक्षवेधी
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः कोकणात ‘शिवगर्जना’ महानाट्याने रेकॉर्ड ब्रेक केले. ‘न भूतो न भविष्यती’, असा प्रतिसाद लाभलेल्या या महानाट्याने हजारो शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत ऐतिहासिक महानाट्यातून शिवकालीन चित्तथरारक प्रसंग, विविधांगी कलाविष्कार आणि नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळ्याची प्रचिती ‘याची देही याची डोळा’ शिवप्रेमींनी अनुभवली.
भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक विशाल परब व सहकारी यांच्या माध्यमातून काल (ता. १७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘शिवगर्जना’ हे आशिया खंडातील महानाट्य सिंधुदुर्गातील शिवप्रेमींना मोफत पाहता आले. येथील एसटी डेपोच्या मैदानावर याचे आयोजन करण्यात आले. उद्यापर्यंत (ता. १९) लोकाग्रहास्तव हे महानाट्य ठेवले आहे. काल सायंकाळी नवीन एसटी आगार मैदान परिसर शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला. महानाट्याच्या सोहळ्याची सुरुवात पोवाड्याने झाली. दोनशे फूट लांबीचा साठ फूट उंचीचा भव्य रंगमंच ही या महानाट्याची खासियत होती. शेकडो कलाकार, उंट, हत्ती, घोडे यांचा वावर यामुळे उत्तरोत्तर हे महानाट्य रसिक वर्गांची उत्कंठा वाढविणारे ठरले. या महानाट्याच्या निमित्ताने शेकडो कलावंतांनी आपल्या कलेला न्याय दिला. भव्य रंगमंचावर वावरणारे कलाकार, त्यांचे विविधांगी कलाविष्कार यामुळे महानाट्य उत्तरोत्तर रंगतदार ठरले. या महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव, दिग्दर्शक स्वप्नील यादव, लेखक इंद्रजित सावंत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते रायगड किल्ल्यावर त्यांचा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आदी सर्व प्रसंग डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यानंतर त्यांना दिलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण, गनिमी काव्याबाबतचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या सोबत असताना मावळा वर्ग मुघलांना कसा नामोहरम करतो, आदी इतिहासाची साक्ष देणारे प्रसंग या महानाट्यातून साकारण्यात आले. काल मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर हे महानाट्य लोकाग्रहास्तव उद्यापर्यंत रसिकांसाठी मोफत ठेवले आहे.
.............
चौकट
चित्तथरारक, लक्षवेधी प्रसंग
या शिवगर्जना महानाट्यात अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराजेंची हत्या, शिवजन्म, युद्धकला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत शहराची लूट, कोकण मोहीम, पावनखिंडीतील शौर्य गाथा, पुरंदर वेढा, मुरारबाजींचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग चित्तथरारक आणि लक्षवेधी ठरले.