
महिलांनी आत्मविश्वास वाढविणे आवश्यक
89912
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा कर्ज योजनेतून चार महिलांना पिंक रिक्षेच्या चाव्या देताना सौ. नीलम राणे, आमदार नीतेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमोद जठार, डॉ. प्रसाद देवधर आदी.
महिलांनो, आत्मविश्वास वाढवा
नीलम राणे ः जिल्हा बॅंकेच्या अबोली रिक्षा योजनेचा प्रारंभ
ओरोस, ता. १८ ः आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने व्यवसाय करावा. जिल्ह्यातील मुली महिलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. त्यांनी पुढे येत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा योजनेच्या प्रारंभ प्रसंगी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील चौघींना कर्ज प्रकरण मंजुरीचे कागदपत्र व रिक्षेची चावी देऊन सौ. राणे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी बँक संचालक आमदार नीतेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, सौ. जठार, संचालक विठ्ठल देसाई, नीता राणे, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्रकाश मोर्ये, डॉ. प्रसाद देवधर, भाजप महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष संधा तेरसे, सायली सावंत, मेघा गांगण, रुपा रावराणे, सायली सावंत, सुप्रिया वालावलकर, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘डॉ. देवधर यांची ही संकल्पना आहे. महिलांच्या हातांना काम मिळावे, म्हणून ही योजना आणली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने निर्णय घेण्याची शिकवण आहे. महिलांचे राज्यातील पहिले भवन नीलम राणे यांनी ओसरगाव येथे सुरू केले. जिल्ह्यातील अकरा लाख लोकसंख्येत साडेपाच लाख महिला आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या दोन्ही हातांना काम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरपंच मेळाव्यात ५० टक्के महिला सरपंच दिसतात. त्याप्रमाणे रिक्षा व्यावसायिक मेळावा घेतल्यास ५० टक्के महिला रिक्षा चालक दिसल्या पाहिजेत. केवळ कर्ज मंजूर करून न थांबता पुढे हा व्यवसाय करताना काही अडचण आल्यास सहकार्य करू. पिंक रिक्षेसाठी अबोली रिक्षा योजनेतून कर्ज घेतलेल्या महिलांनी अन्य महिलांना या व्यवसायात येण्यासाठी प्रवृत्त करावे.’’
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी म्हणाले, नीलम राणे यांच्या हस्ते अबोली रिक्षा कर्ज योजनेचे उद्घाटन व्हावे, ही सर्वांची इच्छा होती. जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी महिलांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. महिलांना अधिकारवाणीने आर्थिक सक्षम करण्याचे काम जिल्हा बँक करीत आहे. प्रत्येक घराचे, व्यक्तीचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. दुग्ध व्यवसायात महिलांचा पुढाकार आहे. जिल्ह्यात किमान १०० पिंक रिक्षा फिरताना दिसल्या पाहिजेत.’’ दरम्यान, उपाध्यक्ष काळसेकर, डॉ देवधर, प्रमोद जठार यांनीही मनोगत व्यक्त केले.
................
चौकट
पिंक रिक्षासाठी सात जणांची नोंदणी
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी जिल्ह्यातील ६० हजार महिला बचतगट बँकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. जिल्हा बँक वाढीत महिलांचा मोठा सहभाग आहे. वर्षाला १५ कोटी रुपये कर्ज वाटप महिला बचतगटाला बँक करते; पण थकबाकी नसून १०० टक्के वसुली होते. त्याप्रमाणे अबोली रिक्षा योजनेत कर्ज घेतलेल्यांनी नियमित परतफेड केल्यास त्यांना अन्य लाभ मिळतील. यावेळी त्यांनी रिक्षा खरेदीची किंमत २ लाख ५८ हजार रुपये असून आज चार जणांना रिक्षा दिल्या आहेत. यासाठी सात जणींनी नोंदणी केल्याचे सांगितले. जानवली येथील स्वरा वारंग, हिंदळे येथील रश्मी तेली, ओसरगावच्या पल्लवी आजवेलकर, तळवडे येथील वीणा रेडकर या चौघींना पिंक रिक्षेची किल्ली देण्यात आली.