अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक
अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक

अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक

sakal_logo
By

rat१८३२.txt

८९९२३
चिपळूण ः वन विभागाने खडपोली येथे पकडलेला लाकडाने भरलेला ट्रक.

खडपोलीत लाकडाची चोरटी वाहतूक पकडली
---
वन विभागाची कारवाई; ट्रकसह एकजण ताब्यात
चिपळूण, ता. १८ ः तालुक्यातील पूर्व विभागात सह्याद्रीच्या खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जंगलतोडीवरून धूमशान सुरू आहे. नांदिवसे तसेच ओवळी येथील लाकूडतोडीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अशातच खडपोली येथे जळाऊ लाकडाने भरलेला विनापरवाना ट्रक वन विभागाने पकडला. ट्रकमधील २९.७४४ घनमीटर लाकूड आणि ट्रक विभागाने जप्त केला आहे. काल (ता. १७) रात्री खडपोली औद्योगिक वसाहतीत चिपळूण वन विभागाने ही कारवाई केली.
वन विभागाने दिलेली माहिती अशी ः तालुक्यातील पूर्व विभागातील नांदिवसे व ओवळी येथील जंगलतोडीची छायाचित्रे आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच, एकाने नांदिवसे येथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याची तक्रारही दिली होती. या तक्रारीनंतर नांदिवसे येथे १२ घनमीटरच्या लाकूडसाठ्याबाबतची कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचवेळी ओवळी गावातही जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्याची ओरड सुरू होती. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओवळी येथे पाहणी केली. मात्र, त्यांना तेथे कोणत्याही प्रकारची जंगलतोड झाल्याचे दिसले नाही. त्यानंतर पुन्हा ओवळी विभागातच तीन किलोमीटरपर्यंत रस्ते काढून जंगलतोड सुरू असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. काल सायंकाळी ओवळी येथून लाकडाने भरलेला ट्रक निघाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात झाली. खडपोली औद्योगिक वसाहतीत रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रक पकडला. या वाहनाची अधिक चौकशी केली असता तो विनापरवाना लाकूड वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. या ट्रकमध्ये २९.७४४ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. या प्रकरणी संशयित जितेंद्र शांताराम शिंदे (रा. ओवळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाकडासह ट्रक ताब्यात घेतला आहे. परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी कीर या अधिक तपास करीत आहेत.