
कुणकेश्वर किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फीन
कुणकेश्वर किनाऱ्यावर
आढळला मृत डॉल्फीन
देवगड, ता. १८ ः कुणकेश्वर (ता.देवगड) येथील समुद्र किनारी एक मोठा मासा कुजलेल्या स्थितीत आढळला. मृत मासा ‘डॉल्फीन’ जातीचा असल्याचे निदर्शनास आले. सुमारे साडेसहा फूट लांब आणि सव्वादोन फूट माशाचा घेर होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाळूत मोठा खड्डा काढून माशाची विल्हेवाट लावल्याची माहिती लक्ष्मण तारी यांनी दिली.
याबाबत तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणकेश्वर येथील समुद्र किनारी आज सकाळच्या सुमारास तेथील ग्रामस्थ व इतिहास संशोधन मंडळाचे रणजित हिर्लेकर यांना एक मासा कुजलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत त्यांनी तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य तारी यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच तारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी देवगड कणकवली परिमंडळाचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांच्याशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. तसेच वनरक्षक नीलेश साठे यांना कळविण्यात आले. वन विभागाच्या सुचनेनुसार कुणकेश्वरचे सरपंच चंद्रकांत घाडी व त्यांचे सफाई कामगार अमित सावंत यांना घटनास्थळी पाचारण केले. किरण पांचाळ, कल्याणी पांचाळ, ओमकार तारी आदींच्या सहकार्याने माशाची विल्हेवाट लावली.