
संगीताचार्य गोविंदराव देसाई
कोकण आयकॉन
--
90065
सतीश पाटणकर
संगीताचार्य गोविंदराव देसाई
पं. गोविंदरावांनी सतत साठ वर्षे हजारो शिष्यांना संगीत विद्येचे ज्ञानदान दिले. स्पष्ट शब्दोच्चार, खुला, मोकळा आवाज यांचे महत्त्व ते पटवून देत. स्वर हा नेहमी शंभर टक्के सुरेलच लावावा, चिजेच्या शब्दांचा अर्थ समजून गायला हवे, असे त्यांचे आग्रही मत होते. गाण्याचा सराव करताना उजव्या हाताने तंबोरा वाजवून डाव्या हाताने डग्ग्यावर ताल धरावा, असे विद्यार्थ्यांना सांगणाऱ्या जुन्या, बुजुर्ग गवय्यांच्या पिढीतले पं. गोविंदराव हे हाडाचे शिक्षक होते.
- सतीश पाटणकर
..............
श्री गोपाळ गायन समाज संगीत विद्यालय ही एक हिंदुस्थानी शास्त्रीय गायन व वादन शिकविणारी नामांकित अशी नोंदलेली धर्मादाय संस्था आहे. या संस्थेची स्थापना संगीताचार्य पं. गोविंदराव देसाई यांनी १ जुलै १९१८ मध्ये एका लहान भाड्याच्या खोलीत केली. १९२६ मध्ये टिळक स्मारक मंदिराच्या पाठीमागे एक प्लॉट घेऊन १९२७ मध्ये तेथे संस्थेची इमारत बांधली. २०१८ हे या संस्थेचे शताब्दी वर्ष आहे. संगीताचार्य पं. गोविंदराव देसाई हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे पट्टशिष्य होते. १९११ ते १९१८ पर्यंत सात वर्षे ते आपले गुरू पं. पलुस्कर यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर भारतभर फिरले. याच काळात त्यांनी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान आपल्या गुरूकडून घेतले. संगीताचार्य पं. गोविंदराव देसाई यांनी अखंड ६० वर्षे या इमारतीतून हजारो शिष्यांना संगीत विद्येचे ज्ञानदान दिले. त्यांनी संगीताचा अभ्यासक्रम तीन भागांत विभागला. संगीत प्रथमा, संगीत मध्यमा व संगीत विशारद असा वर्षांचा हा अभ्यासक्रम नेमून या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संगीताचा पाया भक्कम होऊन तो पुढच्या शिक्षणासाठी योग्य गुरूकडे जाऊन स्वतःचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करेल, अशी व्यवस्था त्यांनी केली. गोपाळ गायन समाजात संगीताचे पायाभूत प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे आपल्या जीवनात संगीतावर आपला स्वतःचा ठसा उमटविणारे दोन विद्यार्थी म्हणजे पंडित (कै.) जितेंद्र अभिषेकी व (कै.) गजाननराव वाटवे. त्याशिवाय श्रीमती उषा चिपलकट्टी, (कै.) दुर्गा फळणीकर, कीर्ती मराठे आदी बरेच विद्यार्थी येथे शिकून गेले. गोविंदराव गोपाळ देसाई यांचा जन्म कोकणातील नाधवडे या गावी झाला. अण्णासाहेब विजापूरकरांसारखे गुरू मिळाल्याने त्यांची साहित्याची जाण प्रगल्भ झाली. पं. विष्णू दिगंबर पलुसकरांकडे संगीताचे शिक्षण घेतल्याने त्यांचे सांगीतिक व्यक्तिमत्त्व प्रभावी झाले. पं. पलुसकरांच्या उपदेशक वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. राष्ट्रीय भावना, नैतिकतेची प्रखर जाणीव असलेले गोविंदराव स्वातंत्र्यलढ्यात खणखणीत स्वरात पोवाडे म्हणून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करत असत. पारतंत्र्याच्या काळातील हे त्यांचे मोठे कार्य होते. पं. विष्णू दिगंबरांच्या आदेशानुसार १ जुलै १९१८ मध्ये त्यांनी पुण्यात ''गोपाल गायन समाज'' या संस्थेची स्थापना केली. विशेष म्हणजे, पुढे त्यांनी स्वत:च्या वास्तूत हे विद्यालय हलवले, तेव्हा ३ एप्रिल १९२७ ला विद्यालयाच्या उद्घाटनाला स्वत: महाराज पलुसकर आले होते. गोविंदरावांनी सतत साठ वर्षे या महाविद्यालयात शिकवले. स्वर हा नेहमी शंभर टक्के सुरेलच लावावा लागतो. स्पष्ट शब्दोच्चार, खुला, मोकळा आवाज यांचे महत्त्व ते पटवून देत. चिजेच्या शब्दांचा अर्थ समजून गायला हवे, असे त्यांचे आग्रही मत होते. गाण्याचा सराव करताना उजव्या हाताने तंबोरा वाजवून डाव्या हाताने डग्ग्यावर ताल धरावा, असे विद्यार्थ्यांना सांगणार्या जुन्या, बुजुर्ग गवय्यांच्या पिढीतले गोविंदराव हे हाडाचे शिक्षक होते. त्यांचे चिरंजीव हरिभाऊ हे उत्तम संवादिनी वादक होते. त्यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराव गात असत, पुढे ते त्यांच्या विद्यालयाचे प्राचार्य झाले. गोपाळ गायन समाजातील कृष्णाष्टमीचा जलसा, पळणीटकर संगीत स्पर्धा जुन्या काळात विख्यात होत्या. पारतंत्र्याच्या काळात संगीतमेळे व प्रभातफेर्या होत असत. त्यात गोपाळ गायन समाजाचा मेळा त्यातील सुरेल पदांसाठी प्रसिद्ध होता. या मेळ्यांतून अनेक होतकरू संगीत कलाकार पुढे आले. देसाई यांना नव्वद वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य मिळाले व पुण्यातच त्यांचे निधन झाले. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)