
कुडाळ येथे ‘शिवगर्जना’ला दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद
90079
कुडाळ ः गजपूजन करताना विशाल परब, वेदिका परब व अन्य. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ येथे ‘शिवगर्जना’ला
दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद
कुडाळ, ता. १९ ः आशिया खंडातील मोठे महानाट्य ‘शिवगर्जना’ला दुसऱ्या दिवशीही हजारोंची उपस्थिती लाभली. या महानाट्यास लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता २०२३-२४ मध्ये भव्य सिंधु महोत्सव घेतला जाईल, असे विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा उद्योजक विशाल परब यांनी जाहीर केले.
भाजप नेते नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खास लोकाग्रहास्तव आयोजित ‘शिवगर्जना’ या महानाट्याला दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारी (ता. १७) भाजप नेते नीलेश राणे यांच्या वाढदिनी म्हणजे महानाट्याच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कालही (ता. १८) महानाट्य पाहण्यास ३० हजारांहुन अधिक नागरिकांनी हजेरी लावली. हे महानाट्य येथील नागरिकांना पाहण्याची संधी देणारे भाजप युवानेते परब यांनी काल नागरिकांशी रंगमंचावरून संवाद साधला. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत त्यांनी आभार व्यक्त केले. या महानाट्य स्थळी परब यांच्या पत्नी वेदिका परब उपस्थित होत्या. यावेळी परब कुटुंबीयांनी शस्त्रपूजन, अश्वपूजन आणि गजपूजन करून आशीर्वाद घेतले. छत्रपतींचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे; पण तो नव्या स्वरुपात सादर करून कोल्हापूरच्या यादव यांनी कोकणातील जनतेला वेगळी अनुभूती दिली. छत्रपतींचा ३०० वर्षांपूर्वीचा जाज्वल्य इतिहास आजच्या मोबाईल दुनियेतील युवा वर्गाला समजण्यासाठी ही संकल्पना राबवून महानाट्य सादर करायचे, अशी भूमिका घेतली. हे महानाट्य कोकणात आणण्यासाठी बरेच दिवस नियोजन करावे लागले. यासाठी माझ्या टीमने ग्रामीण भागात काम केले, अशी माहिती परब यांनी दिली.