
प्रबोधनासाठीच ग्राहक चळवळ
90082
सावंतवाडी ः येथे जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नेहा जोशी.
प्रबोधनासाठीच ग्राहक चळवळ
नेहा जोशी; सावंतवाडीत जागतिक ग्राहक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः कोणतीही ग्राहक चळवळ व्यापारीवर्ग वा व्यावसायिकांच्या विरोधात नसून अनुचित व्यवहार वा अयोग्य व्यवसाय पद्धतीपासून ग्राहकांना संरक्षण मिळण्यासाठी व प्रबोधन करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय सहसचिव तथा कोकण प्रांत संघटक नेहा जोशी यांनी केले. येथील गवाणकर कॉलेजमधे जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षीय भाषणात त्या पुढे म्हणाल्या, ‘‘स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना १९७४ मध्ये करण्या आली. देशभरात विविध प्रांतात ग्राहक पंचायतीकडून ग्राहक चळवळीचे काम सेवाभावी वृत्तीने सुरू आहे. तथापि अजूनही समाजाच्या तळागाळात ग्राहकांना आपले हक्क, कर्तव्य वा जबाबदारीची जाणीव झालेली नाही. त्यासाठी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत प्रबोधन करणे गरजेचे आहे. आजच्या युवाशक्तीने ग्राहक चळवळ समजून घेऊन समाजाच्या दायित्वापोटी सहभाग घेतला पाहिजे. ग्राहकाला मान व न्याय मिळण्यासाठी पुरेसा संयम ठेवून, प्रसंगी झगडून आणि समर्पित भावनेने व राजकारणविरहित युवाशक्तीने या चळवळीत सहभागी व्हावे.’’
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गवाणकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मयेकर तसेच प्राध्यापक नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. तर प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सहसचिव प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जोशी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य गवस, अन्य प्राध्यापक मंडळी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
---
कर्तव्याबाबत सविस्तर माहिती
यावेळी ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सचिव विजय भागवत यांनी ग्राहकांचे हक्क, त्यांचे अधिकार, घ्यावयाची काळजी, जबाबदार नागरिक म्हणून त्यांचे कर्तव्य आदींबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. व्यासपीठावर निवृत्त अभियंता दत्ताराम व सुहासिनी सडेकर, जिल्हा बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक रवींद्र ओगले आदी उपस्थित होते. मॅनेजमेन्टचा विद्यार्थी रामा नाईक यांनी सूत्रसंचालन केले.