शिवसेनेने फुकाचे श्रेय घेऊ नये

शिवसेनेने फुकाचे श्रेय घेऊ नये

90066
सुधीर दळवी

शिवसेनेने फुकाचे श्रेय घेऊ नये

दोडामार्गमध्ये भाजपचा निषाणा; निधी पालकमंत्र्यांमुळेच मिळाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ ः महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युतीचे सरकार आहे. युती सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला असून त्यातून दोडामार्ग तालुक्यातील विविध विकासकामांना निधी मंजूर केला आहे. हा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळेच मिळाला आहे. मंत्री दीपक केसरकरांचे नाव पुढे करून फुकटचे श्रेय शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी घेऊ नये, अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पातून दोडामार्ग तालुक्यासाठी कोट्यवधी निधी मंजूर झाला असून तो शिक्षणमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून झाल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख गवस व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले होते. त्यांच्या या पत्रकार परिषदेवर भाजप तालुकाध्यक्ष दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली.
पत्रकात दळवी यांनी म्हटले आहे की, राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. हे सरकार राज्याच्या विकासकामांसाठी एकमताने धोरणे राबवित आहेत. भाजप-शिवसेना युतीचे सरकार येऊन सहा ते सात महिने झाले. या कालावधीमध्ये पालकमंत्री चव्हाण यांनी आपल्या कामाची झलक दाखवून दिली आहे. केसरकर व माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विकासकामांचा निधी अडकून ठेवला होता. त्यामुळे विकासकामे ठप्प होती. त्या कामांना निधी उपलब्ध करून चालना देण्याचे काम पालकमंत्री चव्हाण यांनी केले आहे. दोडामार्ग नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये विकासाची गंगा सुरू झाली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री चव्हाण यांनाच आहे. केसरकर यांना १३ वर्षांच्या कालावधी जे जमले नाही, ते पालकमंत्री चव्हाण यांनी करून दाखवले. म्हणूनच केसरकर समर्थकांना पोटशूळ झाला आहे.
विकासकामावर एवढा निधी आणण्याची धमक आहे तर, १३ वर्षांच्या कालावधीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास केसरकर अपयशी का ठरले? केसरकर अर्थमंत्री, पालकमंत्री असतानाच्या कालावधीत रस्त्याची काय दयनीय अवस्था होती हे आठवावे. जनतेने किती आंदोलने केली, हे तपासावे. त्या कालावधीमध्ये किती निधी मंजूर करून आणला, ते जाहीर करावे आणि नंतरच श्रेयासाठी पुढे यावे. जनतेची दिशाभूल करू नये. विकासनिधीचा गवगवा करणाऱ्यांनी भाजप-शिवसेनेची युती असताना व आता सात महिन्यांच्या कालावधीमध्ये विकासकामे सुचविताना केसरकरांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले का? आतापर्यंत किती विकास निधी भाजप कार्यकर्त्यांना दिला ते जाहीर करावे. पालकमंत्री चव्हाण यांनी किती पारदर्शकता ठेवून विकास निधी दिला, हे आम्ही जाहीर करू. यापुढे वैयक्तिक श्रेयासाठी टीकाटीप्पणी केल्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही दळवी यांनी दिला.
...............
चौकट
युती सरकारला गालबोट नको
गवस यांना केसरकरांनी दिलेली आश्वासने आठवत नसतील तर त्या आश्वासनांची आठवण आम्ही करून देतो. जनतेची दिशाभूल करू नका. हे युतीचे सरकार आहे आणि दोघांचे मिळून चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. त्याला गालबोट लावण्याचा आततायीपणा न करता सबुरीने घ्या, असा सल्लाही दळवी यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com