
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आज कोकणभवनला बैठक
पान ५ साठी
जनआक्रोश समितीचे
आंदोलन स्थगित ः अॅड. पेचकर
मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आज कोकणभवनला बैठक
चिपळूण, ता. १९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सोमवारी (ता. २०) कोकण भवन येथे बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनआक्रोश समितीने आपले आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती अॅड. ओवीस पेचकर यांनी दिली.
कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी २ वाजता विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महासंचालक, महामार्ग मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. गेल्या १२ वर्षापासून महामार्गचे चौपदरीकरण रखडले आहे. त्यामुळे महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून कोकणच्या या रखडलेल्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच २० मार्चला मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार समितीने केला होता. त्याची जय्यत तयारीही केली होती. मात्र या दरम्यान काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. कधी नव्हे ते कोकणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी हे महामार्ग प्रश्नी एकत्र आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनीही दाखल केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना पुढील ९ महिन्यात महामार्गाचे काम गतीमान होईल, असे उत्तर सभागृहात दिले आहे. तत्पूर्वी मंत्री चव्हाण यांनी सकाळी कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते यांची तातडीची बैठक जनआक्रोश समिती बरोबर घेतली.
या बैठकीत लोकप्रतिनिधींबरोबरच चर्चा करताना ठेकेदारांना येणाऱ्या स्थानिक अडचणींबाबत चर्चा करून त्या सोडविण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. त्यानंतर आता २० रोजी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्याचे अधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक महामार्ग मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याबरोबर आयोजित बैठकीत समितीलाही निमंत्रित केले आहे.