संगमेश्वर-चौपदरीकरणातील सोनवी पुलाचे काम रखडले

संगमेश्वर-चौपदरीकरणातील सोनवी पुलाचे काम रखडले

फोटो ओळी
-rat१९p३८.jpg- KOP२३L९०१३५ संगमेश्वर ः सोनवी पुलाचे काम रखडल्याने ९२ वर्षाच्या या जुन्या पुलावरूनच महामार्गावरील वाहतूक सुरू आहे.
--------------

चौपदरीकरणातील सोनवी पुलाचे काम रखडले

जूना पूल ९२ वर्षांपूर्वीचा ; नवीनचे काम दोन वर्षे ठप्प
संगमेश्वर, ता. १९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर आणि माभळे गावांना जोडणाऱ्या सोनवी पुलाच्या उभारणीला आता ९२ वर्षे पूर्ण झाली आहेत. चौपदरीकरणात दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नवीन पुलाच्या उभारणीचे काम चक्क २ वर्षे ठप्प झाले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाच्या नवनवीन तारखा न्यायालयाला सांगितल्या जात असताना संगमेश्वरच्या दुतर्फा असणाऱ्या ३६ किमी लांबीच्या अपघात प्रवण क्षेत्रातील पुलांची कामे रखडली आहेत. या रखडलेल्या पुलांच्या कामातच सोनवी पुलाच्या कामाचा समावेश आहे. याबाबत संगमेश्वर आणि माभळेवासीयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिटिश काळात १९३३ साली खांब उभारणीसाठी काळ्या दगडांचा वापर करून सोनवी पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलामुळे संगमेश्वर आणि माभळे हे दोन गाव जोडले गेले. सोनवी पूलाच्या माभळे कडील बाजूला अवघड वळण असल्याने या परिसरात अनेकदा अपघात घडले आहेत.
सद्यस्थितीत ५० टन वजन घेऊन मालवाहतूक करणारे अवजड ट्रक सोनवी पुलावरुन जाताच पुलाला हादरे बसत असल्याने पादचारी या पुलावरुन जाता येता जीव मूठीत धरुन जातात. महामार्गाच्या चौपदरीकरणाची ज्यावेळी घोषणा होवून प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ झाला त्यावेळी सोनवी पुलाला आता नवीन पर्यायी पूल मिळणार याची खात्री झाली. चौपदरीकरणाच्या कामाला १२ वर्षांपूर्वी सुरवात झाली असली तरी नवीन सोनवी पुलाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते.
दोन वर्षांपूर्वी मार्चमध्ये सोनवी पुलाचे काम सुरू झाले. मात्र तीन महिने काम झाल्यानंतर जूनमध्ये बंद झालेले पुलाचे काम गेली २ वर्षे ठप्प आहे. पुलाजवळच संगमेश्वरचे बसस्थानक आहे. पूल अरुंद असल्याने पुलाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होते. या सर्व अडचणी लक्षात घेता पुलाचे काम वेगाने होणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. मार्च महिना अर्धा संपला तरी या पुलाचे काम अजूनही सुरू न झाल्याने आता पुढील दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू झाला की सोनवी पुलाच्या पूर्णत्वाची आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com