रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

सन्मित्रनगरमधील प्लॅट चोरट्यांनी फोडला
रत्नागिरी : शहरातील सन्मित्रनगर येथील फ्लॅट फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना १८ मार्चला सकाळी १० ते १ या कालावधीत घडली आहे. याबाबत रोशनी दिलीप फेपडे (वय ३८, रा. अमृतदर्शन सन्मित्र नगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. १८ मार्चला सकाळी त्या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप आणि कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील कपाटाचे ड्रॉवर आणि लॉकर उचकटून रोख १३ हजार रुपये, सोन्याचा नेकलेस, साखळी, मंगळसूत्रातील पेंडल असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.


बेलबागेत दारूविक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा
रत्नागिरी : शहरातील बेलबाग येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. १८) सायंकाळी पावणेसहा वाजता करण्यात आली. आकाश सुनील गिते (वय ३६, रा. बेलबाग, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल मंदार मोहिते यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी आकाश त्याच्या घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची २२० रुपयांची ५ लिटर दारूची विक्री करताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
--------

पावसमधील बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला
पावस ः तालुक्यातील पावस येथील फिनोलेक्स जेटी जवळील समुद्रात मच्छीमारी करताना बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह रविवारी (ता. १९) दुपारी सापडला. प्रवेश प्रभाकर पावसकर (वय ३२, रा. पावस, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. याबाबत बोटीवरील तांडेल विश्वास दगडू डोर्लेकर (रा. पावस, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानुसार १७ ला सायंकाळी प्रवेशचा पाय घसरून तो पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. त्याचा तांडेल व इतर खलाशांनी शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. म्हणून बोटीचे तांडेल विश्वास डोर्लेकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली होती. रविवारी दुपारी एकच्या सुमारास प्रवेशचा मृतदेह तो बुडालेल्या ठिकाणीच पाण्यात तरंगताना मिळून आला. याची माहिती पूर्णगड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयगडमधील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-पेठवाडी येथे वृद्धाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. वनमाळी शिवराम मयेकर (६५, रा. जयगड पेठवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या वृद्धाचे नाव आहे. वनमाळी मयेकर यांनी राहत्या घराच्या पडवीतील छताला असलेल्या लोखंडी चॅनलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना वाटद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी वनमाळी मयेकर यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-------
कोळीसरेत गावठी दारू जप्त
रत्नागिरी : तालुक्यातील कोळीसरे-धनगरवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली. जगदीश रामचंद्र सावंत (४५, रा. बौद्धवाडी, गडनरळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप दाभाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी जगदीश हा कोळीसरे-धनगरवाडी येथील जंगलमय परिसरात ५२५ रुपयांची १० लिटर हातभट्टीची दारू आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.