गुहागर-गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

गुहागर-गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

९०१४८

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम
---
द्विशतकी घरटी संरक्षित; १६२ पिले समुद्रात सोडली
गुहागर, ता. १९ : येथील कासव संवर्धन केंद्रात आज २०० घरटी संरक्षित करण्यात आली. एका हंगामात एवढी घरटी संरक्षित होण्याची कोकण किनारपट्टीवरील ही पहिलीच वेळ आहे. तसेच, गुहागर समुद्रकिनाऱ्यावरून काल (ता. १८) सायंकाळी १६२ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. कासव संवर्धन सुरू झाल्यापासून इतकी पिले एकाच दिवशी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये घरटी सापडण्यास सुरुवात होते; परंतु यंदा डिसेंबरमध्ये ऑलिव्ह रिडले कासवे अंडी देण्यासाठी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास सुरुवात झाली. जानेवारीअखेर दररोज घरटी सापडत होती. त्यामुळे १०० घरट्यांचा आकडा १७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाला. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तर एकेका दिवशी पाचपेक्षा अधिक घरटी सापडत होती. २६ फेब्रुवारीला एकाच दिवशी १० घरटी सापडली. १७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अवघ्या ११ दिवसांत ७० घरटी सापडली. आज कासव संवर्धन केंद्रात २०० वे घरटे संवर्धित करण्यात आले. ऑलिव्ह रिडले कासवांची २१ हजार ४०२ अंडी गुहागरमध्ये संवर्धित केली आहेत.
गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेत आणखी एका विक्रमाची नोंद झाली. काल एकाच वेळी सर्वाधिक १६२ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. गुहागर किनारपट्टीवरील ही पहिलीच वेळ आहे. काल चार घरट्यांतील अंड्यांमधून पिले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत १६२ पिलांचा जन्म झाला होता. या सर्व पिलांना सायंकाळी समुद्रात सोडण्यात आले.

१६ वर्षे मोहीम
गुहागरमध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम गेली १६ वर्षे सुरू आहे. २००७-०८ मध्ये सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेचे भाऊ काटदरे यांनी कासव संवर्धन मोहीम सुरू केली. २०१२-१३ मध्ये वन खात्याने हा उपक्रम आपल्या खात्यामार्फत सुरू केला. २०२१-२२ पर्यंत वन खात्याने केवळ दोन कासवमित्र नियुक्त केले होते. यंदा ही संख्या वाढवण्यात आली. संजय भोसले, प्रसन्न लोंढे, रवींद्र बागकर, लतिश शेटे आणि विक्रांत सांगळे या पाच जणांना वन खात्याने कासवमित्र म्हणून नियुक्त केले आहे. डिसेंबर २०२२ पासून दररोज पहाटे पाच ते सकाळी आठ आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत हे कासवमित्र ७.५ किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालून कासवांची घरटी शोधून संरक्षित करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच कासव संवर्धन मोहिमेला यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com