
दाभोळ-गॅस योजनेचा लाभ देतो सांगून महिलांची फसवणूक
गॅस योजना लाभाच्या
आमिषाने महिलांची फसवणूक
सहाजणांवर गुन्हा ; सात महिलांकडून घेतले ४ हजार
दाभोळ, ता. १९ : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून देतो, असे महिलांना सांगून त्यांचाकडून पैसे घेवून या महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी दाभोळ सागरी पोलिसांनी ६ संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दाभोळ सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील उसगाव येथील प्रतीक्षा टेमकर, सुवर्णा टेमकर, लक्ष्मी धोपट, नयना टेमकर, मंजुळा धोपट, प्रतीक्षा टेमकर, वैशाली थोरे या महिलांच्या घरी १८ मार्चला जावून आपण सरकारी कर्मचारी असून आपणास पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये असे एकूण ४ हजार रुपये घेवून त्यांची फसवणूक केली. ही गोष्ट उसगाव येथील कौस्तुभ वैद्य यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उसगावचे माजी सरपंच नीलेश गोयथळे यांच्या कानावर घातली, ही माहिती कळताच नीलेश गोयथळे यांनी उसगाव गणेशवाडी येथे धाव घेतली. या महिलांकडून पैसे घेणाऱ्या ६ संशयितांना दाभोळ सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी ऐश्वर्या आगरे यांनी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संगीता मोहन पोवळे (रा. नांदेड), सुनीता बद्रू बादावत (रा. भद्रावती, चंद्रपूर), ममता श्रीकृष्ण डांगरे (अकोला), अशोक पांडुरंग जोगदंड (रा. बीड), श्यामसुंदर वैजीनाथ जौंजाळ (बीड), विठ्ठल लिंबाजी सलगर (रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.