
मासे पकडणे बेतले जीवावर
90176
जितेंद्र तारी
90177
दाभिल ः नदीपात्रात याचठिकाणी जितेंद्र याचा मृतदेह आढळून आला.
मासे पकडणे बेतले जीवावर
दाभिल येथील घटना; ओटवणेतील मत्स्यव्यावसायिकाचा बुडून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः ओटवणे-तारीवाडी येथील जितेंद्र उर्फ राजू उत्तम तारी (वय ३४) या तरुणाचा दाभिल-नेवली येथील तेरेखोल नदीपात्रात मासे पकडत असताना बुडून मृत्यू झाला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा बांदा पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. विच्छेदन अहवालनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जितेंद्र हा एकुलता एक व घरातील कमवता असल्याने तारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जितेंद्र हा मनमिळावू असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. आजच्या दुर्घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने युवकांनी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. याबाबत बांदा पोलिस व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा पंचक्रोशीत मासे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आज नेहमीप्रमाणे तो सकाळच्या सत्रात इन्सुली परिसरात मासे विक्री करून दुपारी घरी परतला. घरातून जेवण करून दुपारी दीडच्या सुमारास ओटवणे-गावठाणवाडी येथील महेश सुरेश गावकर व प्रसाद सोमा बांदेकर या मित्रांसमवेत दाभिल नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यांनी दाभिल येथील आकाबाई देवस्थान शेजारील नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाळे टाकले. सुरुवातीला त्यांनी कमी पाण्यात मासे पकडले. त्यानंतर नदीच्या एका बाजूला असलेल्या दगडांच्या कपारीत अधिक मासे पकडण्यासाठी जाळे पसरविले. सुमारे अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर जितेंद्र हा खोल पाण्यात जाळे काढण्यासाठी उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या सोबतच्या दोघांनी आरडाओरडा केली; मात्र जितेंद्र हा जाळ्यातच अडकल्याने पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती सोबतच्या युवकांनी गावात जाऊन दिली. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत जितेंद्रला नदीपात्रात शोधण्याचा प्रयत्न केला. याची खबर स्थानिकांनी बांदा पोलिसांना दिली.
बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोरजकर, हवालदार विजय जाधव, बाळकृष्ण गवस यांनी घटनास्थळी येत नदीपात्राची पाहणी केली. पोलिस कर्मचारी बाळकृष्ण गवस यांनी पाण्यात उतरत जाळ्यात अडकलेल्या जितेंद्रला पाण्याबाहेर काढले; मात्र सुमारे एक तासाहून अधिक काळ पाण्यात राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.
.................
चौकट
नातेवाईकांकडे जाण्यापूर्वीच काळाचा घाला
जितेंद्र हा आज दिवसभरातील कामे आटोपून गोवा येथे आपल्या नातेवाईकांकडे जाणार होता. त्याने तशी कल्पना नातेवाईकांना दिली होती; मात्र दुपारीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने नातेवाईकांना शोक अनावर झाला. बांदा आरोग्य केंद्रात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. जितेंद्र हा बऱ्याच वेळी मासे पकडण्यासाठी या नदीपात्रात जात असे. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे. याबाबतची फिर्याद मृत जितेंद्रचे वडील उत्तम तारी यांनी बांदा पोलिसांत दिली. अधिक तपास बांदा पोलिस करत आहेत.